जिल्ह्यात कंत्राटी वीज कर्मचारी संपावर, महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

वीज पुरवठ्यात व्यत्यय आल्यास काय?

गडचिरोली : तीनही वीज कंपन्यांमधील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घेण्यासह इतर मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस काम बंद आंदोलन केल्यानंतरही योग्य तोडगा न निघाल्यास ५ मार्चपासून बेमुदत ‘काम बंद’ची हाक त्यांनी दिली आहे. गडचिरोलीत बुधवारी महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी निदर्शने केली.

या संपकाळात अवकाळी पावसासह काही नैसर्गिक समस्या उद्भवल्यास वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटी वीज कामगारांची संयुक्त कृती समिती, कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत तिन्ही कंपन्यांची सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ वाजतापासून राज्यभरातील कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत.

अशा आहेत कंत्राटी वीज कामगारांच्या मागण्या

तिन्ही वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात १ एप्रिलपासून ३० टक्के वाढ करा, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करा, कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदारविरहित शाश्वत रोजगार द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायीप्रमाणे समान काम समान वेतन द्या अशा प्रमुख मागण्या आहेत.