

गडचिरोली : समाजात टिका ही झालीच पाहिजे. पत्रकार आणि पॅालिटिशियन हे नेहमीच टिकेचे धनी होतात. लोकशाहीत सरकारच्या चुका काढणं हा पत्रकारांचा अधिकार आहे, पण मांडलेली गोष्ट तपासून लिहिणं ही जबाबदारी त्यांनी कायम लक्षात ठेवावी, असे सांगत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी यशस्वी होण्यासाठी आपला सोर्स मजबूत ठेवण्याचा सल्ला पत्रकार दिनी तमाम पत्रकारांना उद्देशून दिला. आपल्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत सर्वात मोठा वाटा पत्रकारांचाच आहे, अशी जाहीर कबुलीही त्यांनी आपल्या भाषणात दिली. आपल्याबद्दल माध्यमांमध्ये चांगल्या बातम्यांसोबत कधी वाईटही लिहिल्या गेले, पण कोणत्याही निमित्ताने मला बातम्यांमध्ये ठेवून पत्रकारांनी मोठे केले, असे वडेट्टीवार म्हणाले.
गडचिरोली प्रेस क्लबतर्फे आयोजित जिल्हा गौरव पुरस्कार वितरण समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. शैक्षणिक, हॅाटेलिंग व्यवसायासोबत विविध सामाजिक उपक्रमात योगदान देणारे अझिझ नाथानी यांना मंगळवारी संध्याकाळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित समारंभात गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आमदार रामदास मसराम, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, हिंदूस्थान टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, तर प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे अध्यक्षस्थानी होते.
आ.वडेट्टीवार आपल्या भाषणात म्हणाले, लेखणी शाबुत राहिली तरच लोकशाही टिकेल. पण आज पत्रकारांच्या व्यथा खूप आहेत. मालक लोकांकडून त्यांचे शोषण होत आहे, अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली. गडचिरोलीकरांमध्ये क्रीडा क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात नाव करण्याची क्षमता आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. काल-परवापर्यंत लोक गडचिरोलीतून बाहेर जात होते, पण आज बाहेरून लोक गडचिरोलीत येत आहेत, असे सांगत वडेट्टीवार यांनी बदलत्या गडचिरोलीकडे लक्ष वेधले.
सत्कारमूर्ती अझिझ नाथानी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मी खरं तर विदेशात होतो. पण माझ्या छोट्या भावाप्रमाणे असणाऱ्या अझिझ नाथानींचा गौरव होत असल्याने मी हे निमंत्रण नाकारू शकलो नाही. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करण्यासोबत अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहे. त्यांचा मला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी समाजाच्या प्रगतीत प्रसार माध्यमांचे महत्व काय आहे हे सांगितले. पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड करताना मोठी कसरत असते. कारण लोक दोन्ही बाजुने बोलणारे असतात. मात्र जिल्हा गौरव पुरस्कारासाठी नेहमी योग्य व्यक्तीचीच निवड केली जाते, याबद्दल त्यांनी प्रेस क्लबचे कौतुक केले. अझिझ नाथानी यांच्या वडीलांपासून असलेल्या कौटुंबिक संबंधावर आणि नाथानी कुटुंबियांनी गडचिरोलीकरांना दिलेल्या शैक्षणिक योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.
आमदार रामदास मसराम, नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर पत्रकार दिन आणि पत्रकारिता यावर भाष्य केले. तर नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांनी पत्रकारांपुढील आव्हाने, त्यांच्या समस्या, अडचणी मांडून त्यांच्यासाठी नागपुरात राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. सत्काराला उत्तर देताना अझिझ नाथानी यांनी गडचिरोलीकरांचे प्रेम असेच मिळत राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद उमरे, संचालन प्रा.संध्या येलेकर तर आभार प्रदर्शन प्रेस क्लबचे उपाध्यक्ष रुपराज वाकोडे यांनी केले. सत्कारमूर्तींचा परिचय प्रेस क्लबचे सचिव शेमदेव चाफले यांनी दिला.































