गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा 13 वा दीक्षांत समारंभ आज बुधवार, दि.21 रोजी सकाळी 11.30 वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या नविन सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.प्रशान्त बोकारे राहणार असून प्रमुख प्राहुणे म्हणून सर्चचे संस्थापक डॉ.अभय बंग हे दीक्षांत भाषण करणार आहेत . यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
सदर समारंभामध्ये अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद यांचे सदस्य, दानदाते आणि विद्यापीठातील विविध प्राधिकरणांचे, मंडळाचे, समित्यांचे सदस्य यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या समारंभात विशेष गुणवत्ताप्राप्त, प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनींना मिळून एकूण 39 सुवर्ण पदक, आचार्य पदवी, पदवी, पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी केले आहे .
या समारंभात विविध विद्याशाखांच्या एकूण 96 विद्यार्थ्यांना आचार्य पदवीने सन्मानित केले जाणार आहे. तसेच विद्याशाखानिहाय सुवर्ण पदकांमध्ये मानव विज्ञान विद्याशाखा 23, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा 8, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा 5, आंतरविद्याशाखिय विद्याशाखा 3 अशा एकूण 39 विद्यार्थ्यांना सुवर्ण, एक रजत अशी एकूण 40 पदके प्रदान केली जाणार आहेत. तसेच स्पार्क अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत दिली.
































