गडचिरोली : देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम आहे. तुमच्यात असलेल्या प्रतिभेचा पूर्ण उपयोग करून जीवनात येणाऱ्या आव्हानांचा सामना करा आणि विद्यापीठाचे नाव रोषण करा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. बुधवारी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारलेल्या वातानुकूलित शामियानात हा समारंभ झाला. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत, कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे मंचावर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, गोंडवाना विद्यापीठाच्या अथक परिश्रमातून स्थानिक आदिवासी, मागास घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून चांगली संधी मिळाली आहे. अतिशय कमी खर्चात उपलब्ध झालेल्या उपयुक्त शिक्षणातून या ठिकाणी विद्यार्थी घडत आहेत. चांगल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्याचा फायदा येथील पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती व परंपरा जपण्यासाठी होईल.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून गडचिरोलीच्या विकासाला चालना दिली आहे. ज्या जिल्ह्याचे पालकत्व विद्यमान मुख्यमंत्र्यांनी घेतले होते. विद्यमान उपमुख्यमंत्री ज्या जिल्ह्याचे सध्या पालकमंत्री आहेत, आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांची ज्या जिल्ह्यावर कृपादृष्टी आहे, तो जिल्हा मागास राहू शकत नाही, असे सांगत खांद्याला खांदा लावून पुढे जा, असा सल्ला त्यांनी दिला.
विद्यापीठाने गेल्या 12 वर्षात चांगली प्रगती केली आहे. 39 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या जिल्हयात विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे. महाविद्यालयबाह्य असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी निर्माण करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गडचिरोली जिल्हा मागास, दुर्गम आहे. याचे कारण पायाभूत सुविधांचा अभाव होता. मात्र आता रस्ते, उद्योग, शिक्षण , आरोग्य आदी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री व वनमंत्री यांनी या जिल्हयासाठी अनेक कामे मंजूर केली आहेत. रेल्वे, विमानतळ, लोहप्रकल्प यामुळे येथे गुंतवणूक वाढणार आहे. या सर्व प्रक्रियेत गोंडवाना विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील सर्वोत्तम खनिज संपत्ती असलेल्या या जिल्ह्यात औद्योगिक विकासातून रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे. जिल्ह्याच्या विकासात गोंडवाना विद्यापीठाचेही योगदान महत्त्वाचे आहे. राज्य सरकार विद्यापीठासाठी निधीची कमतरता कधीही पडू देणार नाही. गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ, रेल्वे आदी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. जिल्ह्याची आदिवासी संस्कृती ही आपला एक समृद्ध वारसा आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून या संस्कृतीचे जतन होऊन ती आणखी विकसित होईल, असे ते म्हणाले.
सुरूवातीला प्रास्ताविकात कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाच्या वाटचालीवर आणि सध्या राबविल्या जात असलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.नरेंद्र आरेकर व प्रा.शिल्पा आठवले यांनी अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतून केले.
राष्ट्रपतींच्या हस्ते पाच विद्यार्थ्यांचा सन्मान
या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते अमित रामरतन गोहने (मानव विज्ञान विद्याशाखा), अर्पिता पुरुषोत्तम ठोंबरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा), लोकेश श्रीराम हलामी व सदाफ नफीस अहमद अन्सारी (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) यांना सुवर्णपदक तर सारिका बाबुराव मंथनवार यांना शिक्षणशास्त्र या विषयात आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची दांडी
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच नव्याने मंत्रिपदाची शपथ घेणारे ना.धर्मरावबाबा आत्राम यांची नावे होती. मात्र मुंबईत सुरू असलेल्या महत्वाच्या राजकीय घडामोडींमुळे त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याचे दिसून आले.