गडचिरोली : जन्मापासून ज्या मुलांना अंगाखांद्यावर घेऊन वाढवले त्यांचा अखेरचा प्रवासही खांद्यावर घेऊन करावा लागण्याची दुर्दैवी वेळ एका दाम्पत्यावर आली. अंधश्रद्धा आणि वर्षानुवर्षे सुविधांचा अभाव यामुळे त्या चिमुकल्या बालकांना नेमके काय झाले याचे योग्य निदान होण्याआधीच त्यांना जीव गमवावा लागला. अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे आई-वडीलांनी शवपरीक्षणाला नकार देत मृतदेह खांद्यावर घेऊन अनेक किलोमीटरची पायपीट केली. आकांक्षित गडचिरोली जिल्ह्याचे हे विदारक चित्र बदलण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला आणखी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) आणि दिनेश रमेश वेलादी (3 वर्ष), रा.येरांगडा ता.अहेरी, अशी त्या मृत बालकांची नावे आहेत. पोळ्याच्या सणानिमित्त रमेश वेलादी पत्नी आणि दोन्ही मुलांना घेऊन मुलांच्या मामाच्या गावाला पत्तीगाव येथे आले होते. त्या ठिकाणी ताप येण्याचे निमित्त झाले आणि उपचारासाठी डॉक्टरऐवजी त्या भावंडांना पुजाऱ्याकडे नेण्याची चूक आई-वडीलांनी केली. पण त्याची एवढी मोठी सजा मिळेल याची कल्पनाही त्यांनी केली नसावी. पुजाऱ्याने दिलेल्या जडीबुटीने त्या बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी प्रकृती आणखीच बिघडली.
अखेर पायपीय करत त्यांनी मुलांना घेऊन जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. मात्र उशिर झाला होता. आधी मोठा मुलगा बाजीरावचा मृत्यू झाला, तर दिड तासाने छोटा मुलगा दिनेशनेही प्राण सोडले. जिमलगट्टा येथून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने चारचाकी वाहन जाण्यासाठीही अडचण होती. त्यात शववाहिका उपलब्ध होण्यास थोडा उशीर झाला. मात्र मृतदेह शवपरिक्षणासाठी नेण्यास आई-वडिलांनी नकार देत मुलांचे मृतदेह स्वत:च गावाकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. मृतदेह खांद्यावर घेऊन ते नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढत गावाकडे निघाले.
देचलीपेठा येथून शववाहिका बोलवली, पण वेलादी दाम्पत्याने मृतदेह शवपरीक्षणासाठी नेण्यास नकार दिल्याचे आणि शववाहिकेने जाण्यास नकार दिल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. बरेच अंतर पायी गेल्यानंतर नातेवाईक दुचाकीने त्यांना घेण्यासाठी आले. त्यावरून ते पत्तीगावला पोहोचले. मृतदेहाचे शवपरिक्षण न झाल्याने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
रुग्णवाहिका किंवा शववाहिका कोणत्याही गावात जाऊ शकण्यासारखे बारमाही रस्ते आणि पूल तयार करण्याकडे दुर्लक्ष, अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी जनजागृतीचा अभाव, या गोष्टी प्रशासकीय उदासीनतेची झलक दाखविणाऱ्या आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी आणखी किती जीवांना प्राणाची आहुती द्यावी लागेल, असा संतप्त सवाल उमटत आहे.
शवपरिक्षणासाठी मन वळविण्याचा प्रयत्न
त्या बालकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे निदान करणे आरोग्य विभागाच्या दृष्टिने महत्वाचे आहे. पण आई-वडिलांच्या आग्रहापुढे संबंधित आरोग्य यंत्रणा हतबल झाली. आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन न करता ते मुलांचे मृतदेह घेऊन गेले. मात्र त्या बालकांवर अग्निसंस्कार झाले नसल्यामुळे मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणून शवपरिक्षण करण्याचे प्रयत्न आरोग्य यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दिली.