गडचिरोली : युवकांच्या शारीरिक विकासाला चालना मिळावी यासाठी नमो चषक-२०२४, अर्थात खासदार चषक रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जिल्हा स्टेडीअमवर उत्साहात सुरू आहे. आजच्या स्थितीत युवा वर्ग मोबाईलमधील गेममध्ये व्यस्त झाली आहे. त्यामुळे युवकांमध्ये शारीरिक श्रम व शारीरिक हालचाली कमी होताना दिसतात. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. ती प्रेरणा मिळावी यासाठीच अशा क्रिकेट स्पर्धा महत्वाच्या ठरतात, असे प्रतिपादन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले.
यावेळी खासदार नेते यांनी उत्साहाने मैदानात उतरून हातात बॅट घेऊन खेळण्याचा आनंद घेतला. या स्पर्धेत प्रथम व द्वितीय पुरस्कार संयुक्तपणे खा.अशोक नेते यांच्याकडून दोन लक्ष रूपये व एक लक्ष रुपये, तर तृतीय पुरस्कार स्व.वामनराव देशमुख यांच्यास्मृतीप्रित्यर्थ प्रवीण वामनराव देशमुख यांच्याकडून, चतुर्थ सावकार टीव्हीएस शोरूम यांच्याकडून दिला जाणार आहे. विजेत्या संघाना ट्रॉफीही दिली जाणार आहे.
यावेळी मंचावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते तथा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे, ज्येष्ठ नेते नामदेवराव शेंडे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी जि.प.अध्यक्ष सोमया पसुला, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, आयोजक पवन गेडाम, सचिन मडावी, सुरज वैरागडे, आर्यन वरगंटीवार, साहील बारापात्रे, तसेच मोठ्या संख्येने भाजपा युवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.