अवघ्या चार दिवसात 8 हजार हेक्टरवरील पिकांना बसला पुराच्या पाण्याचा फटका

सर्वाधिक नुकसान देसाईगंज तालुक्यात

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या 19 ते 22 जुलै या अवघ्या चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाज पाहणीत 8 हजार 277 हेक्टर क्षेत्रावरील पीकांना फटका बसला आहे. अजूनही अतिवृष्टी आणि पूरस्थिती कायम असल्याने नुकसानीचा हा आकडा आणखी वाढणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराव मास्तोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.19 ते 22 जुलै या चार दिवसात पूरपरिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा नजरअंदाज काढण्यात आला. त्यात 585 गावांमधील 8 हजार 277 हेक्टर क्षेत्रातील पीकांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान 9 हजार 780 शेतकऱ्यांचे आहे. यात भात या मुख्य पिकासह कापूस, सोयाबीन आणि भाजीपाल्याचा समावेश आहे.

सर्वाधिक 2016 हेक्टर क्षेत्रातील नुकसान देसाईगंज तालुक्यात तर त्याखालोखाल 1945 हेक्टर क्षेत्रातील नुकसान गडचिरोली तालुक्यात झाले आहे. मात्र पुन्हा पाऊस आणि पूर कायम असल्याने हे नुकसानीचे क्षेत्र जिल्हाभर वाढण्याची शक्यता आहे. पाऊस थांबल्यानंतर प्रत्यक्ष सर्व्हेक्षण होऊन अंतिम आकडेवारी निश्चित केली जाईल.