गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जनजाती गौरव दिवसानिमित्त “अनुभव आदर्श संस्कृतीचा – महोत्सव आदिवासी कलागुणांचा” या कार्यशाळेचे आयोजन गुरूवारी मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथी सभागृहात केले होते. आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात आदिवासी जीवन, संस्कृती व परंपरेसह आदिवासी विकासाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी विकासमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांच्यासह माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते, खासदार डॉ.हेमंत सावरा, आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम इंगळे, प्रदेश संघटनमंत्री अॅड.किशोरजी काळकर, प्रदेश कार्यालय प्रमुख रवी अनासपुरे यांच्यासह अंजिक्य कुलकर्णी, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गडचिरोली जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते, अरविंद गेडाम, एन.डी.गावित, डॉ.अक्षय जव्हेरी, दिवाकर गेडाम यांच्यासह अनेक पदाधिकारी व सोशल मीडियाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे सन्मानचिन्ह देऊन मा.खा.डॉ.अशोक नेते यांचा सत्कार करण्यात आला. आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके यांनी “आबा धरती योजना”सहित आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीवर विस्तृत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत आदिवासींची जनजातीय राजकीय स्थिती, आदिवासी जनजातीय विमर्श व विश्लेषण, सोशल मीडियाची कार्य समिती व भूमिका, आदिवासी परंपरा, कलागुण व कलासंपन्न वारसा यासह भगवान बिरसा मुंडा गौरव दिनानिमित्त विचार–चिंतन करण्यात आले. समाजातील युवा पिढीला शिक्षण, रोजगार व सांस्कृतिक ओळख देण्यासाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरला.












