सायकलवरून सायबर जागृती, गडचिरोली पोलिसांचा उपक्रम

महिन्यात विविध कार्यक्रमही होणार

गडचिरोली : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे आणि इंटरनेट व समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण चांगलेच वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या मार्गदर्शनाखाली, ऑक्टोबर 2025 हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून संपूर्ण सर्व जिल्ह्रांमध्ये पाळला जात आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.12) ‘सायबर जनजागृती सायकल रॅली’चे आयोजन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले होते.

पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते ट्रेंड्स मॉल, धानोरा रोड पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या जनजागृती सायकल रॅलीत पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्यासह 300 पोलीस अधिकारी/अंमलदारांनी सहभाग घेतला. या सायकल रॅलीचा समारोप शहिद पांडू आलाम सभागृहात करण्यात आला.

या जनजागृती सायकल रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्ह्रांचे प्रमाण देखील वाढत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच या महिन्यात विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृती मोहिम, ऑनलाईन वेबिनार्स तसेच सोशल मिडियावरील प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे.

कोणत्याही सायबर फसवणुकीस बळी पडल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930/1945 वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले.

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.अरुण फेगडे, सायबर पोलीस स्टेशनच्या मपोउपनि.नेहा हांडे, तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.