मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सायकली व शिलाई मशीनचे वाटप

टायगर ग्रुपच्या गणेशोत्सवात अन्नदान

आलापल्ली : अहेरी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि मुख्य शहर अशी ओळख असलेल्या आलापल्ली येथे टायगर ग्रुपद्वारा आयोजित गणेशोत्सवात राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते अतिदुर्गम भागातील गरजूंना सायकली आणि शिलाई मशीन, तसेच तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले.

टायगर ग्रुपतर्फे क्रीडा संकुल परिसरात मागील वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गेल्यावर्षी केदारनाथचा देखावा सादर केला होता. यंदा देखील गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याचा जिवंत देखावा सादर केला आहे. या ठिकाणी भव्य असा मेला (मिनाबाजार) देखील सुरू असून भाविकांची रिघ लागली आहे. 16 सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यादरम्यान दि.13 रोजी ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या ठिकाणी अहेरी तालुक्यातील दुर्गम अशा कमलापूर, छल्लेवाडा, कोडसेलगुडम व ताटीगुडम परिसरातील गरजूंना सायकल, शिलाई मशीन व तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले.

मंत्री धर्मरावबाबा यांचे आगमन होताच टायगर ग्रुपच्या सदस्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. गणपतीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी गरजुंना साहित्य वाटप केले. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सरपंच शंकर मेश्राम, राकाँचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, पुष्पा अलोने, कैलास कोरेत, सोमेश्वर रामटेके, सुरेंद्र अलोने, टायगर ग्रुपचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री धर्मरावबाबा यांच्या हस्ते अन्नदान

क्रीडा संकुल परिसरात आयोजित गणेशोत्सवात गणपतीच्या दर्शनासह येथील जिवंत देखावा आणि मेल्याचा आनंद लुटण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यातर्फे महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मंत्री आत्राम यांनी उपस्थित राहून भाविकांना आपल्या हाताने महाप्रसादाचे वितरण केले. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी सज्ज राहण्याची सूचना केली.