
अहेरी : येथील मुख्य चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांनी केले. अध्यक्षस्थानी युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, तर प्रमुख अतिथी म्हणून अमित बेझलवार होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना तनुश्री आत्राम यांनी, कोणत्याही स्पर्धेत व खेळात चिकाटी, जिद्द, परिश्रम लागते. त्यातून खिलाडीवृत्ती येते आणि खिलाडीवृत्तीतूनच सर्वांगीण विकास साधता येतो, असे म्हटले. या स्पर्धेकरिता आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून शिल्ड व 51 हजारांचे बक्षीस ठेवले होते. डीजेच्या तालावर जल्लोषात दहीहंडी स्पर्धा झाली. यात व्यंकटरावपेठा येथील गोंडवाना ग्रुपच्या पथकाने दहीहंडी फोडून बक्षीस मिळविले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी, तर आभार श्रीकांत गदेवार यांनी मानले. या स्पर्धेसाठी आदित्य जक्कोजवार, सचिन येरोजवार, अक्षय संतोषवार, देवेंद्र खतवार, स्वप्नील सल्लावार आदींनी परिश्रम घेतले.