गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर संगणकशास्त्र विभागात प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या दक्षता चंद्रमणी बांबोळे या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून गडचिरोली जिल्ह्याची मान उंचावली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन) यांच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. संविधान मुल्ये, सामाजिक समता व न्याय या विषयांवर आधारित या स्पर्धेत राज्यभरातून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल 26 जानेवारी रोजी जाहीर झाला. दक्षता बांबोळे हिने उत्कृष्ट लेखनशैली, सखोल अभ्यास आणि प्रभावी मांडणीच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवला.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र तसेच 3,000 रुपयांचा धनादेश दक्षता हिला सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख, तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी दक्षता बांबोळे यांचे अभिनंदन करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
































