गडचिरोलीत क्रीडा उत्सवाचा जल्लोष, कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

स्वप्नझेप अकॅडमीचे आयोजन

गडचिरोली : शहरातील काँम्प्लेक्स टी–पाँईट चौक परिसरात स्वप्नझेप करिअर अकॅडमी व युवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य डे–नाईट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या रंगतदार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

या कार्यक्रमास आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, भाजप किसान मोर्चाचे रमेश भुरसे, जेष्ठ नेते डॉ.भारत खटी, माजी पं.स.उपसभापती विलास दशमुखे, तसेच परमानंद पुनमवार, मोहन ठाकरे, स्वप्नझेप करिअर अकॅडमीचे संचालक सुमित चव्हाण, जितेश कुकुडकर, प्रशांत कोटगले, रंजित रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.अशोक नेते म्हणाले, “खेळ खेळताना पंचांचा निर्णय अंतिम मानणे हीच खरी क्रीडाभावना आहे. त्यामुळे कोणतेही वाद-विवाद होत नाहीत. कबड्डीसारख्या सांघिक खेळामुळे शरीरसुदृढता, शिस्त, तंदुरुस्ती आणि संघभावना निर्माण होते. एक काळ असा होता की कबड्डी हा खेळ लोप पावण्याच्या मार्गावर होता; मात्र आज तो पुन्हा नव्या लोकप्रियतेने युवकांच्या मनात स्थान मिळवत आहे. स्वप्नझेप करिअर अकॅडमीमधील युवक पोलीस भरतीसाठी मेहनत घेत आहेत, असे म्हणत त्यांनी क्रीडा उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ.डॉ.मिलिंद नरोटे व मा.आ.डॉ.देवराव होळी यांनीही युवकांना क्रीडाक्षेत्रात सक्रिय राहण्याचे तसेच पोलीस भरतीसारख्या स्पर्धात्मक प्रक्रियेत शिस्त, मेहनत व सातत्य ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले.

खेळाडूंशी हस्तांदोलन करून सर्व संघांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्रकाश झोतात सुरू झालेल्या या सामन्यांनी उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. स्वप्नझेप करिअर अकॅडमीचे विद्यार्थी–विद्यार्थिनी, युवक खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्यांचा मनसोक्त आनंद घेतला.

या डे–नाईट कबड्डी स्पर्धेमुळे गडचिरोली टी–पाँईट चौक परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळाले आहे. युवकांना क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीची प्रेरणा देणारा हा उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे.