नवेगांव मालमध्ये कबड्डीचा थरार, ग्रामीण क्रीडा कौशल्याची झलक

मा.खा.नेते यांच्या हस्ते शुभारंभ

चामोर्शी : तालुक्यातील मौजा नवेगांव (माल) येथे वीर शिवाजी युवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य डे-नाईट कबड्डी स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.नेते म्हणाले की, “नवेगांव (माल) येथे कबड्डी खेळाची सलग 13 वर्षांची परंपरा अत्यंत कौतुकास्पद आहे. दरवर्षी आनंदाच्या वातावरणात ही परंपरा जपत कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत, हे गावाच्या क्रीडाप्रेमी वृत्तीचे प्रतीक आहे. कबड्डी हा देशी मातीतला आणि शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक ताकद वाढवणारा खेळ आहे. ग्रामीण भागात कबड्डीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळत आहे. खेळाडूंनी राष्ट्रभावना आणि प्रामाणिक खेळसंस्कृती जपत मैदानात उतरावे.”

यावेळी त्यांनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अनेक भागांत विकासकामांना गती देण्यात आली असून हा विकासाचा वेग सातत्याने कायम ठेवला असल्याचे सांगितले. नवेगांव (माल) येथील ग्रामस्थांनी मांडलेल्या रस्त्यांच्या समस्या व इतर अडीअडचणी निश्चितपणे सोडविण्यात येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीत दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

गावात प्रवेश करताना नवेगांव (माल) ग्रामस्थांनी औक्षण करून, ढोल-ताशांच्या गजरात केलेल्या भव्य स्वागताबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या कबड्डी उद्घाटन कार्यक्रमाला प्रामुख्याने ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा मुरखळाचे सरपंच भास्कर बुरे, माजी पंचायत समिती सदस्य राजू पा.चौधरी, तालुका महामंत्री संजय खेडेकर, सरपंच सोमलता चौधरी, उपसरपंच चरणदास चौधरी, रविंद्र वाटघुरे, भुवनेश्वर चौधरी, नकटुजी भिवनकर, संजय चलाख, बाबुराव चौधरी, रूपेश बांगरे, आत्माराम चौधरी, ठुमदेव डायकी, साईनाथ मेश्राम, कबड्डी मंडळाचे अध्यक्ष राकेश कोहपरे, चेतन डायकी, सचिन पिठाले, वैभव डायकी, विवेक भिवनकर, तसेच नवेगांव (माल) गावातील मान्यवर, नागरिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या डे-नाईट कबड्डी स्पर्धेमुळे नवेगांव (माल) परिसरातील तरुण खेळाडूंना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून ग्रामीण क्रीडा संस्कृतीला नवचैतन्य मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवर व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.