वाहून गेलेल्या काका-पुतण्याचा अखेर मृत्यू, मृतदेह सापडले

पुरामुळे जिल्ह्यात 6 मार्ग बंद

भामरागडच्या बाजारात असे पाणी साचल्यामुळे परिसर जलमय झाला आहे
पर्लकोटा नदीच्या पुलावर रविवारी सकाळी अशी स्थिती होती.

गडचिरोली : चार दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले काका-पुतणे पुराडा-बेळगाव दरम्यानच्या नाल्याच्या पुरात वाहून गेले होते. शनिवारी त्यांचे मृतदेह सापडल्याने त्यांच्या जीवंत असण्याची आशा मावळली आहे. तलवारशहा मडावी (45 वर्ष पुतण्या) आणि देवसाय मडावी (65 वर्ष, काका) अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघेही सोनपूर येथील रहिवासी होते. दरम्यान गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढवून तो 5587 क्युमेक्स करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती कायम असून रविवारी सकाळी 6 मार्गांवरील वाहतूक अडलेली होती. विशेष म्हणजे भामरागडच्या पर्लकोटा नदीचे पाणी वाढल्याने पुन्हा अनेक गावे संपर्काबाहेर गेली आहेत.

23 जुलै रोजी कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी हे काका-पुतणे गेले होते. अंत्यसंस्कार आटोपून परत येताना, पुराडा-बेळगाव दरम्यानच्या नाल्याला पूर आल्याने त्यांनी मोटारसायकलसह नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा जोर जास्त असल्याने ते दोघेही मोटारसायकलसह वाहून गेले. मागून येणाऱ्या प्रवाशांनी हे दृष्य पाहिले आणि त्यांनी तात्काळ बेळगाव पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असताना त्यांची मोटारसायकल रस्त्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर सापडली, मात्र त्या दोघांचा थांगपत्ता लागत नव्हता. मोटारसायकलच्या नंबरवरून पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आणि सोनपूर गावातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी सरपंच मोहन कुमरे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस शोधमोहीम राबवली. अखेर काल चौथ्या दिवशी दोघांचे मृतदेह आढळून आले. या दुर्दैवी घटनेमुळे सोनपूर गावावर शोककळा पसरली आहे.

पुरामुळे बंद असलेले मार्ग

1) हेमलकसा – भामरागड राष्ट्रीय महामार्ग 130 डी (पर्लकोटा नदी), ता.भामरागड
2) सिरोंचा- असरअली- जगदलपूर रस्ता, राष्ट्रीय महामार्ग-63 (वडधम गावादरम्यान) (हलक्या वाहनांकरिता वाहतूक सुरू आहे. जड वाहतूक बंद)
3) अहेरी- वटरा रस्ता, राज्यमार्ग 370 (वटरा नाला) तालुका अहेरी
4) कुरखेडा- वैरागड रस्ता (सती नदी), ता.कुरखेडा
5) कढोली-उराडी रस्ता, प्रजिमा-7, तालुका कुरखेडा
6) हलवेर – कोठी रस्ता, तालुका भामरागड