विहिरीतील ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या मजुरांचे मृतदेहच हाती लागले

रात्री 12 वाजताच्या सुमारास काढले

मृत मजुरांचे कुटुंबिय दिवसभर विहिरीच्या जवळ बसून शोक व्यक्त करत होते.

सिरोंचा : तालुक्यातील जामनपल्ली गावातील शेतात विहिर खोलीकरणाच्या कामादरम्यान खालच्या भागातील मातीची कडा कोसळून त्याखाली दोन मजूर गाडल्या गेले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना दिवसभरात यश आले नाही. अखेर रात्री 12 वाजताच्या सुमारास त्यांचे मृतदेह हाती लागले.

रवी अंकुलू उप्पुला (30 वर्ष) आणि समय्या अमय्या कोंडा (33) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही जामनपल्लीतीलच रहिवासी होते. तालुका प्रशासन, पोलीस यांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी एकच टाडो फोडला.

धनाड्डा समक्का यांच्या शेतातील या विहिरीच्या कामावर 8 मजूर होते. त्यापैकी तिघे विहिरीत उतरून खालची माती खोदून ती वर चढवत होते. याचवेळी खालच्या भागातील जवळपास 10 फुट खोदकाम झाल्यानंतर वाळूमिश्रित मातीची कडा कोसळली. यावेळी संपत कोंडा याला दोरीच्या सहाय्याने कसेबसे बाहेर काढण्यात आले, मात्र रवी आणि समय्या हे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने त्यांना हालचाल करायला संधीच मिळाली नाही.

मंगळवारी दिवसभर त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही. पोलीस आणि तहसील कार्यालयाच्या चमूने रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृत मजुरांनी लहान मुले आहेत.