
गडचिरोली : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी दुसऱ्या बॅचची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी कॅालेजच्या अधिष्ठात्यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम बायोकेमिस्ट्री विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. (अधिक बातमी खाली वाचा)

प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे, पी.जी. अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रसाद बन्सोड, अॅनाटॉमी विभागप्रमुख डॉ.हेमलता अंबाडे, फिजिओलॉजी विभागप्रमुख डॉ.नितीन धोखणे, तसेच बायोकेमिस्ट्री विभागप्रमुख डॉ.नरेंद्र डांगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ.वर्षा तांबसे आणि डॉ.हर्षल पचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी 2024 बॅचच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांची माहिती सादर केली. तिन्ही विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आणि वैद्यकीय शिक्षणातील प्रामाणिकता व परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
यानंतर अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी, सेवा भावना आणि मानवी मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमात वरिष्ठ विद्यार्थी अमन पटेल (द्वितीय वर्ष) यांनी आपला अनुभव मांडला, तर कनिष्ठ विद्यार्थी पृथ्वीराज पाटील आणि श्रेयन रेड्डी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्थ टेकळे (द्वितीय वर्ष) यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.सुरभी यांनी केले. राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
































