संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेसह तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाई करा

गडचिरोली, अहेरीत प्रशासनाला निवेदने

गडचिरोली : परभणी येथे 10 डिसेंबर रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर, तसेच आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी गडचिरोली येथील विविध राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटनांनी केली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या नावाने लिहिलेले निवेदन 16 डिसेंबर रोजी संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजय दैने यांना सादर करत याबाबत चर्चा केली. यासोबतच गडचिरोली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन आदिवासी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी जलदगती न्यायालयाव्दारे न्यायनिवाडा करून आरोपीला कडक शिक्षा आणि पीडित मुलीला अर्थसहाय्य देण्यात यावे, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली.

परभणी प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन यातील मास्टरमाईडंचा शोध घ्यावा, आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयील कोठडीत मृत्यू होण्यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई करण्यात यावी, तसेच आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्यात याव्या, त्यांची सुटका करण्यात यावी अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शिष्टमंडळात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, बीआरएसपीचे जिल्हा प्रमुख मिलिंद बांबोळे, कॅाम्युनिष्ट पार्टीचे रोहिदास फुलझेले, नारायणसिंग उईके समितीच्या कुसुम अलाम, काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष वसंत राऊत, समशेरखान पठाण, रजनीकांत मोटघरे, नंदु वाईलकर, आदिवासी विकास परिषदेचे कुणाल कोवे, संविधान फाउंडेशनचे गौतम मेश्राम, भारतीय बौध्द महासभेचे तुलाराम राऊत, आदिवासी एम्प्लॅाईज फेडरेशनचे भरत येरमे, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे विलास निंबोरकर, माळी समाज समितीचे हरिदास कोटरंगे, नारीशक्तीच्या जयश्री येरमे यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे प्रदीप भैसारे, प्रल्हाद रायपुरे, अशोक खोब्रागडे, पुण्यवान सोरते, नरेंद्र रायपुरे, अरविंद वाळके, रेखा तोडासे, मंजू आत्राम, विना उईके, कविता उराडे, शालीनी पेंदाम, सुनिता उसेंडी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अहेरीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

परभणी प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीमुळे भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे सांगत त्यांच्या कुटुंबीयाला शासनाच्या वतीने 50 लाख आणि सदस्याला शासकीय नोकरी देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी अहेरीत एका निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांच्या नेतृत्वात शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या निवेदनात परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पोलिसांच्या कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशा अनेक मागण्या करण्यात आल्या.

निवेदन देताना सुरेंद्र अलोणे, प्राचार्य विष्णू सोनोने, देवाजी अलोणे, गणपत तावाडे, दीपक सुनतकर, राहुल गर्गम, कपिल झाडे, संदीप ढोलगे, कनिष्का रामटेके, गौतम मुंजमकर, मधुकर दुर्गे यांच्यासह इतर युवक उपस्थित होते.