अहेरीतील वादग्रस्त ले-आऊटचा विषय पोहोचला विधिमंडळ अधिवेशनात

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी वेधले लक्ष

गडचिरोली : अहेरी परिसरातील नियमबाह्य ले-आऊटसह जमिनींच्या खरेदी-विक्री प्रकरणांबाबत माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची गांभिर्याने चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी विधानसभेत केली.

अजय कंकडालवार हे पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊ कंकडालवार यांच्या सर्व मागण्यांबाबत ठोस कारवाई करावी, त्यांनी मांडलेल्या संपूर्ण प्रकरणांची महिनाभरात चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ना.वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे यांनी कंकडालवार यांची उपोषण मंडपात भेट घेऊन त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गुरूवारी रात्री हे उपोषण समाप्त करण्यात आले.