जिल्ह्यातील 422 ग्रामपंचायतींमध्ये फिरणार विकसित भारत संकल्प यात्रेची व्हॅन

बुधवारी वैरागड आणि पोटेगावातून शुभारंभ

गडचिरोली : भारत सरकारच्या विविध योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत राबविली जाणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील वैरागड (ता.आरमोरी) आणि पोटेगाव (ता.गडचिरोली) येथील ग्रामपंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

सदर मोहीम गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, सिरोंचा या १० तालुक्यातील 422 ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे.

असे असेल या यात्रेचे स्वरूप
सदर कार्यक्रमादरम्यान आरोग्य शिबिर, कृषीविषयक सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला, खेळाडू, विद्यार्थी इत्यादींचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय योजनांची प्रचार प्रसिध्दी करण्याकरीता १० तालुक्यातील 422 ग्रामपंचायत स्तरावर प्रसिध्दी व्हॅन (वाहने) फिरणार आहे, असे जिल्हाधिकारी संजय मिना यांनी कळविले.

काय आहेत यात्रेची उद्दिष्टे
विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या,परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, वैयक्तिक कथा/अनुभव कथनातून सरकारी योजनांच्या लाभार्थ्याशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे अशी उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत.

या यात्रेदरम्यान समन्वय साधण्यासाठी केंद्र शासन स्तरावर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय ही ग्रामीण आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त असलेल्या क्षेत्रांसाठी नोडल मंत्रालये राहणार आहेत. शहरी भागांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय ही नोडल मंत्रालये राहणार आहेत.