पोलीस मदत केंद्रामुळे उघडणार अतिदुर्गम भागात विकासाचे दार

माओवाद्यांच्या गडात पोलिसांचा ठिय्या

गडचिरोली : भामरागडपासून पलिकडे छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील जंगलांनी वेढलेल्या गावांना जाण्यासाठी अजूनही रस्ते नाहीत. शाळकरी मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. गावात वीज पुरवठा येणे हे अजूनही त्यांच्यासाठी स्वप्नच आहे. शासनाच्या कित्येक योजनांचा तर त्या आदिवासी नागरिकांना थांगपत्ताही नाही. कायम माओवाद्यांच्या दहशतीत राहून जीवन जगणाऱ्या त्या आदिवासींच्या जीवनात आता खऱ्या अर्थाने विकासाची पहाट उगवण्याचा मार्ग पोलिसांनी मोकळा केला आहे. यावर्षीचे चौथे आणि गेल्या तीन वर्षातील आठवे पोलीस मदत केंद्र फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे उघडण्यात आले.

घनदाट जंगलात 1000 सी–60 कमांडो, 21 बॅाम्ब शोधक-नाशक पथक, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदाराच्या मदतीने 24 तासात या नवीन पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. त्याचे लोकार्पण रविवारी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सीआरपीएफ 37 बटालियनचे कमांडण्ट दाओ इंजिरकन किंडो आणि इतर वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गावातील आबालवृद्धांसह युवक-युवती आणि छोटी मुलेही उपस्थित होती.

पायाभूत सुविधांसह विविध सुविधा मिळणार

गेल्या 28 आॅक्टोबरला 2025 रोजी राज्य शासनाने फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) या पोलीस मदत केंद्राच्या स्थापनेस मंजुरी दिली होती. माओवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या अबुझमाडच्या पायथ्याशी पोलिसांचा ठिय्या आल्याने आता त्या भागात फिरकणे माओवाद्यांना कठीण होणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी येणारे अडथळे दूर होतील, असा विश्वास यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला. या मदत केंद्राच्या उभारणीमुळे मौजा फुलनार व मौजा कोपर्शी येथील अडलेले मोबाईल टॉवरचे बांधकाम पूर्ण करण्यास मदत होणार आहे. याशिवाय नजीकच्या काळात या अतिदुर्गम भागात रस्ते बांधकाम होऊन एस.टी.बसची सेवा सुरु करणे शक्य होणार आहे. यामुळे गावकरी, तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

वर्षभरात 4 ठिकाणी झटपट उभारणी

भामरागडपासून 20 किलोमीटर आणि छत्तीसगड सिमेपासून फक्त 7 किमी अंतरावर असलेल्या त्या भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे पोलीस मदत केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. पेनगुंडा, नेलगुंडा, कवंडे आणि आता फुलनार असे अतिदुर्गम भागात वर्षभरात चार पोलीस मदत केंद्र उभारण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती शाखेकडून विविध उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

असा आहे मदत केंद्रातील फौजफाटा

या पोलीस मदत केंद्रात पोलीस अधिकारी आणि जवानांसाठी वायफाय सुविधा, 12 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी. मोर्चा, 8 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी केली जात आहे. यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 3 अधिकारी व 50 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 14, संभाजी नगर सी कंपनीचे 2 प्लाटुन, तसेच सीआरपीएफ 37 बटालियन एफ कंपनीचे 1 असिस्टंट कमांडन्ट आणि 62 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 8 पथक (200 कमांडो) तैनात करण्यात आले आहेत.

गावकऱ्यांना विविध साहित्याचे वाटप

पोलीस मदत केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी रविवारी जनजागरण मेळावाही आयोजित केला होता. यावेळी महिलांना साड्या, चप्पल, पुरुषांना घमेले, ब्लॅकेट, स्वयंपाकाच्या भांड्यांचा संच, मच्छरदाण्या, युवकांना लोअर पॅन्ट, टि-शर्ट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, कंपास, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल तथा बालकांना चॉकलेट, बिस्कीटांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, सहाय्यक पोलीस अधीक्षक (धानोरा) अनिकेत हिरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते व पोलीस मदत केंद्र फुलनार (कॅम्प गुंडुरवाही)चे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि.युवराज घोडके व पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी पो.उपनिरीक्षक प्रतीक भदाने यांनी केले.