गडचिरोली : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांनी अतिसंवेदनशिल भामरागड तालुक्यातील जंगलात असलेल्या पेनगुंडा या नवनिर्मित पोलीस मदत केंद्राला आणि लाहेरी उपपोलीस स्टेशनला भेट दिली. जेमतेम आठवडाभरापूर्वी 24 तासात सुरू केलेल्या पेनगुंडा मदत केंद्रात कार्यरत पोलीस अधिकारी आणि जवानांचे शुक्ला यांनी मनोबल वाढविले. तसेच जनजागरण मेळाव्यात गावकऱ्यांना साहित्यांचे वाटप केले.
यावेळी अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल प्रामुख्याने उपस्थित होते.
या भेटीत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नवनिर्मित पेनगुंडा पोलीस मदत केंद्रातील वाढदिवस असलेल्या अधिकारी व जवानांना केक भरवून त्यांचा वाढदिवस साजरा केला. जंगलातील या मदत केंद्रात अधिकारी-जवानांसाठी असलेल्या सुविधांची आणि तेथील कामकाजाची पाहणी त्यांनी केली. तसेच तेथील अधिकारी व अंमलदारांसोबत संवाद साधला. त्यानंतर परिसरातील माओवादविरोधी अभियानाचा आढावा घेतला.
यासोबतच पोलीस महासंचालकांच्या हस्ते पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या महाजनजागरण मेळाव्याला उपस्थित नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लँकेट, लोअर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, स्कुल बॅग, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या नवीन पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातर्फे आपल्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्या जाईल. विविध योजनांचा येथील जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा. काही दिवसांतच येथे रस्ते, आरोग्य सेवा इ. सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असा विश्वास यावेळी पोलीस महासंचालकांनी गावकऱ्यांना दिला.
पेनगुंडा येथे उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते आणि प्राणहिता सी-60 चे जवान श्रीराम सोरी यांचा वाढदिवस असल्याने पोलीस महासंचालकांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. यासोबतच जवानांचे मनोबल उंचाविण्याकरीता आणि पेनगुंडा येथे बडाखाण्याचे आयोजन करण्याकरीता पोलीस महासंचालकांनी एक लाख रुपयांचे बक्षीस दिले.
लाहेरी येथे माआवोदविरोधी अभियानाचा आढावा घेत सर्व पोलीस अधिकारी, अंमलदारांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच जवानांसोबत जेवनाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाला सीआरपीएफचे कमाडंण्ट जसवीर सिंग, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे उपस्थित होते.