पोलीस महासंचालकांची पुन्हा अतिसंवेदनशिल क्षेत्राला भेट

आज माओवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी (दि.9) छत्तीसगड सीमेकडील अतिसंवेदनशिल क्षेत्रात नव्याने उभारण्यात आलेल्या फुलणार पोलीस मदत केंद्र (कॅम्प गुंडूरवाही) येथे भेट दिली. याशिवाय अतिसंवेदनशिल गर्देवाडा येथे त्यांच्या हस्ते पोलिसांनी सुरू केलेल्या 74 व्या वाचनालयाचे उद्घाटन आणि लाहेरीत उपपोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. आज बुधवारी (दि.10) काही माओवादी (नक्षलवादी) गडचिरोलीत रश्मी शुक्ला यांच्यापुढे आत्मसमर्पण करणार आहेत.

त्यांच्या या दौऱ्यात गर्देवाडा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी फुलनार पो.म.केंद्र (कॅम्प गुंडूरवाही) येथील अभियानाच्या तयारीची पाहणी केली आणि उपस्थित अधिकारी व अंमलदारांशी संवाद साधला.

विविध साहित्यांचे वाटप

यासोबतच गुंडूरवाही हद्दीतील नागरिकांसाठी पोलीस महासंचालक शुक्ला, तसेच अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे व इतर वरीष्ठ अधिका­ऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जनजागरण मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात उपस्थित नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लॅकेट, लोवर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, स्कुल बॅग, क्रिकेट कीट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यात अतिदुर्गम फुलनार, गुंडूरवाही परिसरातील 500 वर नागरीक उपस्थित होते.

रस्ते व आरोग्य सेवाही मिळणार

नागरिकांशी संवाद साधताना रश्मी शुक्ला म्हणाल्या, या नवीन पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातर्फे आपल्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. गडचिरोली पोलीस दल राबवित असलेल्या विविध योजनांचा येथील जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा. तसेच छत्तीसगड सिमेपासून अगदी जवळ महाराष्ट्र राज्याच्या अगदी शेवटी असलेला हा भाग अतिदुर्गम जरी असला तरी, काही दिवसांमध्ये येथे रस्ते, आरोग्यसेवा इ. सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. या अतिसंवेदनशिल भागामध्ये सर्व अधिकारी व जवानांनी येथील नागरिकांसोबत एकजुटीने राहुन आपले कर्तव्य पार पाडावे व येत्या काळात आम्ही माओवाद संपवून गडचिरोली जिल्ह्राचा विकास करू, अशी ग्वाही दिली.

एक गाव – एक वाचनालय

उपविभाग हेडरीअंतर्गत अति-संवेदनशिल पोमकें गर्देवाडा हद्दीतील विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगारांच्या विचाराला बळ यावे, स्पर्धा परीक्षेची ओढ निर्माण व्हावी यासाठी “एक गाव, एक वाचनालय” या उपक्रमाअंतर्गत गर्देवाडा येथे 74 व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला सर्व वरीष्ठ अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते. ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरीकांनी पारंपरिक वेशभूषा करून व पारंपरिक वाद्य वाजवून उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. सदर वाचनालयामध्ये स्वतंत्र अभ्यासिका, बैठक व्यवस्थेकरीता टेबल, खुर्ची, पुस्तके, पुस्तके ठेवण्याचे कपाट व इतर मुलभुत सुविधा देण्यात आल्या आहेत. यानंतर मौजा गर्देवाडा येथे लोकसहभागातून व पोमकें गर्देवाडा येथील अधिकारी व अंमलदारांच्या सहभागातून उभारण्यात आलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या सर्व कायक्रमांप्रसंगी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधिरा, उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) योगेश रांजणकर व इतर अधिकारी उपस्थित होते.