पोलीस महासंचालकांच्या भेटीत नक्षलमुक्तीच्या रणनितीवर चर्चा

बिनागुंडात जवानांसोबत जेवण

नक्षलविरोधी अभियानातील आगामी रणनितीवर चर्चा करताना पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ अधिकारी.

गडचिरोली : राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर सदानंद दाते यांनी पहिला गडचिरोली दौरा केला. 31 मार्चपर्यंत गडचिरोली जिल्ह्याला माओवादातून मुक्त करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या अभियानावर यावेळी महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या दौऱ्यात त्यांनी माओवाद्यांचे अस्तित्व असलेल्या छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील बिनागुंडा या अतिसंवेदनशिल क्षेत्रात नव्याने उभारलेल्या पोलीस मदत केंद्राला भेट दिली. तिथे कार्यरत अधिकारी आणि पोलीस जवानांसोबत खाली बसून जेवण घेत त्यांचे मनोधैर्य वाढवले. याशिवाय वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि राष्ट्रपती शौर्यपदक मिळालेल्या अधिकारी व जवानांचा सत्कार केला.

या दौऱ्यात महासंचालक दाते यांच्यासोबत अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) डॅा.छेरिंग दोरजे, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, एसआरपीएफ नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अनिल कुमार आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल प्रामुख्याने उपस्थित होते.

या दौऱ्याच्या निमित्ताने बिनागुंडा पोमकेंच्या हद्दीतील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून महाजनजागरण मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला उपस्थित नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लँकेट, लोवर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, स्कुल बॅग, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपास, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यात 500 हून अधिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी बिनागुंडातील विनोबा आश्रम शाळेतील इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी आदित्य पोदाडी याने उपस्थित नागरिकांसमक्ष महाराष्ट्र गीताचे सुरेख सादरीकरण केले. नागरिकांशी संवाद साधताना पोलीस महासंचालक सदानंद दाते म्हणाले, या नवीन पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातर्फे विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ येथील नागरीकांना देण्यात येईल. या अतिदुर्गम भागामधील नागरीकांच्या सुविधेसाठी लवकरच येथे रस्ते, आरोग्य सेवा व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पोलीस दल येथील नागरीकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

यावेळी पोलीस महासंचालकांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पोमके बिनागुंडा येथे कर्तव्य बजावणारे सीआरपीएफ, एसआरपीएफ व गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी तथा अंमलदारांसोबत पंगतीत बसून भोजन केले.

या भेटीदरम्यान वांगेतुरी येथील नवीन प्रशासकिय इमारतीचे उद्घाटन सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. सदर सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीमुळे अतिदुर्गम भागात कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी व अंमलदार, तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार

गडचिरोलीत आल्यानंतर पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कसनासूर-बोरीया येथे माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी करणा­ऱ्या शौर्यपदक प्राप्त 31 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्रात कर्तव्य बजावताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 5 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. या अधिकारी व अंमलदारांच्या खांद्यावर स्टार लावून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना दाते यांनी जवानांच्या अडचणी समजून घेवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अवघड परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावत असताना आपल्यासमोर मोठे उद्दिष्ट ठेवून प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहायक पोलीस अधीक्षक (धानोरा) अनिकेत हिरडे, पोलीस उपअधिक्षक (अभियान), विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) योगेश रांजणकर व इतर अधिकारी उपस्थित होते.