अहेरी : येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी पंचशील ध्वजारोहन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका जयश्री खोंडे यांच्या हस्ते फडकविण्यात आला. त्यानंतर सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, तर विचारपीठावर जयश्री खोंडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नारायण अलोणे, नगरसेविका मीना ओंडरे, दीपिका अलोणे, प्राचार्य निरज खोब्रागडे, अनंत पेटकर आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकून मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोणे यांनी, तर सूत्रसंचालन राहुल गर्गम यांनी केले. आभार मारोती ओंडरे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.
सायंकाळी भव्य भीम रॅली
धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने अहेरी शहरातून भव्य भीम रॅली काढण्यात आली. अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी रॅलीदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन रथाला अभिवादन केले.

































