गडचिरोली : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. जिल्ह्यातील 453 गावांमध्ये याअंतर्गत डिजिटल शेतीशाळा हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, तसेच भूमिहीन कुटुंबांना कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे शेती अधिक किफायतशीर करण्यास मदत होत आहे.
बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत ‘डिजिटल शेतीशाळा’ हा उपक्रम अभियान स्वरूपात राबविण्यात येत आहे. हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) विषयक मार्गदर्शनासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना शास्त्रोक्त व पीकनिहाय मार्गदर्शन करण्यात आले. झूम आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या सत्रात पेरणीपूर्व तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला. यामध्ये बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, आंतरपीक पद्धत अवलंबणे, बीज उगवण क्षमता चाचणी तसेच बीजप्रक्रिया यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी व समूह सहाय्यक यांच्या माध्यमातून हा उपक्रम गावपातळीवर राबविण्यात आला. जिल्ह्यातील एकूण 453 गावांमध्ये या शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी, महिला बचत गट सदस्य, महिला शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य यांनी उत्स्फूर्तपणे त्यात सहभाग नोंदविला.
शेतीसंदर्भातील विविध समस्या चर्चेच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून त्यांचे निराकरण करण्यात आले. आगामी खरीप हंगामात या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पुढील नियोजित डिजिटल शेतीशाळांमध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
































