नवीव वर्षाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी

मानव–वन्यजीव संघर्षाचाही समावेश

गडचिरोली : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नवीन वर्षाच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याची आपत्तीप्रवणता लक्षात घेऊन संभाव्य धोके, त्यांचे स्वरूप, चालू व भविष्यातील, तसेच नव्याने उद्भवणाऱ्या जोखिम, संवेदनशील ठिकाणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा समावेश असलेल्या या आराखड्यावर चर्चा केल्यानंतर सदर आराखड्यास प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आली.

जिल्ह्यातील विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि सज्जतेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दिले.

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी नवीन आराखड्याबाबत माहिती दिली. बैठकीत प्राधिकरणाचे सदस्य आणि विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे सर्व विभागांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा आढावा घ्यावा आणि आराखड्यानुसार कार्यवाही सुनिश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मानव–वन्यजीव संघर्षावर तातडीच्या उपाययोजना

या आराखड्यात मानव–वन्यजीव संघर्षाचाही समावेश करण्यात आला आहे. विशेषतः वडसा व गडचिरोली वनविभागात या संघर्षाची तीव्रता वाढत असल्याचे वन विभागाकडून निदर्शनास आणण्यात आले. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

पूरस्थिती नियंत्रण व पूर्वसूचना यंत्रणा

भामरागड, अहेरी व सिरोंचा तालुक्यांतील मान्सूनकालीन पूरपरिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपातळीवर अलर्ट यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच धरणांतून पाणी विसर्गाबाबत ऑटोमॅटिक पूर्वसूचना देणारी प्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश पाटबंधारे विभागास देण्यात आले. भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पर्लकोटा व पामुलगौतम नद्यांमुळे उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत सखोल सर्वेक्षण करून उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

या बैठकीला उपवनसरंक्षक आर्या व्ही.एस., उपव‍िभागीय अध‍िकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अरुण एम., निवासी उपज‍िल्हाध‍िकारी आश‍िष वानखेडे, पाटबंधारे व‍िभागाचे कार्यकारी अभ‍ियंता राहुल मोरघडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभ‍ियंता अव‍िनाश मोरे व सुरेश साखरवाडे, तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.