देसाईगंज : झाडी बोली, माडिया व गोंडी या बोली समृद्ध, जिवंत आणि निसर्गाशी समरस असलेल्या बोली असल्याने त्यांच्यात विशेष गोडवा आहे. या बोलींमधून भावना सहज आणि प्रभावीपणे व्यक्त करता येतात. बोलीभाषा ही ग्रामीण संस्कृतीचा मौल्यवान वारसा आहे. त्यातून आपल्या संस्कृतीचा आत्मा व्यक्त होतो. शिवाय या बोली परंपरांचे जतन व संवर्धन करतात. त्यामुळे बोलींचे जतन होणे आवश्यक आहे, असे मत बोली भाषेवरील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी व्यक्त केले.
मराठी भाषेतील विविध बोलीभाषांचे जतन, संवर्धन व प्रचार व्हावा या उद्देशाने मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, आणि देसाईगंजमधील आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित ‘बोलींचा जागर- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंगळवारी पार पाडला. यावेळी झाडी बोली आणि माडिया-गोंडी भाषेवर तज्ज्ञांनी मंथन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाने, जेष्ठ झाडीबोली नाट्य कलावंत पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक भाषा संचालक बाबासाहेब जगताप, झाडीबोलीचे मार्गदर्शक डॉ.सदानंद बोरकर, डॉ.श्याम मोहरकर, माडिया गोंडी भाषेवरील मार्गदर्शक प्रा.डॉ.नरेश मडावी, विशेष अतिथी म्हणून झाडीपट्टीतील बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवयित्री अंजनाबाई खुणे, गोंडवाना विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ.सविता गोविंदवार, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.धनराज खानोरकर, स्व.गोविंदराव कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, भाषा संचालक अभयराजे कुलकर्णी, समन्वयक प्रा.डॉ.हितेंद्र धोटे, प्रा.डॉ.निहार बोदेले, प्रा.वैशाली लिचडे, प्रा.डॉ.अमोल चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकपरंपरेचे सुंदर सादरीकरण
ग्रंथदिंडी दरम्यान आदिवासी नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लेझिम, भजने, लोकगीते, तसेच बोलीभाषा संवर्धनावरील घोषवाक्यांच्या गजरात संपूर्ण देसाईगंज शहर दुमदुमून गेले.
गडचिरोली जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या विविध बोलीभाषांचा प्रभावी उपयोग करत पथनाट्य सादर करण्यात आले. गोंडी बोलीतील सांस्कृतिक दर्शन घडवून देत गीतगायनाच्या माध्यमातून बोलीभाषांचे वैशिष्ट्य प्रभावीपणे मांडण्यात आले. झाडीबोलीतील विवाहप्रसंगी गायली जाणारी पारंपरिक मंगलाष्टके सादर करून लोकपरंपरेचे सुंदर दर्शन घडविण्यात आले. यावेळी प्रसिद्ध कलाकार हिरालाल पेंटर यांनी गडचिरोलीतील बोलीभाषांवर आधारित नकला व गीते सादर करत बोलीभाषांचा उत्कृष्ट जागर केला. विशेष म्हणजे मुख्य बाजारपेठेतून ग्रंथदिंडी जात असताना व्यावसायिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालखी धरण्यासाठी पुढाकार घेतला. या सहभागामुळे कार्यक्रमाला सामाजिक एकात्मतेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या फोटोला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून झाली. प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांनी अध्यक्षीय भाषणात, या कार्यक्रमातून झाडी आणि माडिया गोंडी बोलींचा इतिहास, संस्कृती, वैशिष्ट्ये सर्वांना समजून घेता आली, यासाठी शासनाचे आभार व्यक्त केले.
पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांनी झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून झाडीबोली लोकांच्या मनामनात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य देसाईगंजमधून सुरू असल्याचे नमूद केले. आपले ज्या बोलीवर प्रेम आहे, ज्या संस्कृतीत आपण राहतो, त्या संस्कृतीतील सूक्ष्म बारकावे शोधून त्यात जगले पाहिजे, असे ते म्हणाले. मात्र आधुनिकीकरणाच्या युगात आपण हळूहळू आपली बोली विसरत चाललो आहोत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
भाषा संचालक अभयराजे कुलकर्णी यांनी शासनाच्या बोलींच्या जागर या उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. प्रमाणभाषेत अधिकाधिक बोलीभाषेतील शब्दांचा समावेश झाल्यास मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, या उद्देशानेच राज्यभर ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
प्रा.सदानंद बोरकर म्हणाले, झाडी बोली ही अत्यंत समृद्ध असून तिच्यातून अनेक कलावंत घडले आहेत. एक्का, रोवणी, डहाके, नाटके, दंडार यांसारख्या लोककलांमध्ये झाडी बोलीचा प्रभावी वापर केला जातो. झाडीपट्टी रंगभूमीवर सध्या 10 हजारांहून अधिक कलाकार कार्यरत आहेत. दरवर्षी सुमारे 80 कोटी रुपयांची उलाढाल होते. या बोलीभाषेवर आधारित दरवर्षी 4 हजारांपेक्षा अधिक नाट्यप्रयोग होऊ त्यातून अनेकांना रोजगार मिळतो. मात्र या व्यापक कार्याची शासन दरबारी पुरेशी दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नाटकाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या झाडीपट्टी नाटकांचे प्रतिनिधित्व सार्क इंटरनॅशनल स्तरावरही झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.श्याम मोहरकर म्हणाले, झाडी बोलीवर सुमारे 500 वर्षे गोंड राज्याचे वर्चस्व राहिल्याने गोंडी भाषेचा प्रभाव पडल्याचे त्यांनी नमूद केले. या बोलीत सुमारे 50 हजार शब्द अर्थासह नोंदविले गेले असून गडचिरोली जिल्ह्यात मानवी वस्तीपासूनच ही भाषा अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले. बोलीभाषेबाबत आजच्या तरुणांना न्यूनगंड वाटत असल्याने शिकलेली मंडळी बोलीभाषेत बोलताना दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
माडिया गोंडी भाषेवर मार्गदर्शन करताना डॉ.नरेश मडावी यांनी या बोलीचा इतिहास, संस्कृती, कला व संवर्धनाची आवश्यकता स्पष्ट केली. गोंडी ही अतिशय प्राचीन भाषा म्हणून ओळखली जाते. या भाषेचे समृद्ध साहित्य प्रामुख्याने मौखिक स्वरूपात उपलब्ध आहे. गोंडी भाषा ही द्राविडीयन भाषाकुळातील आहे. भारतातील 15 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ती बोलली जाते, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र काळाच्या ओघात ही भाषा मागे पडलेली आहे. गोंडी भाषेचे संवर्धन होण्यासाठी शब्द संग्रह तयार करणे, शाळांमध्ये या भाषेचे स्थान वाढविणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी ‘बोलींचा जागर’ या उपक्रमाचे कौतुक करत बोलीभाषा या प्रमाण भाषेला समृद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे मत व्यक्त केले. तसेच प्रा.धनराज खानोरकर यांनी आपल्या बोलीभाषेतून म्हणी व कवितांचे सादरीकरण करून बोलीभाषांचे प्रभावी दर्शन घडविले. कवयित्री अंजनाबाई खुणे यांनी झाडी बोलींवरील म्हणी, उखाणे आणि कवितांचे प्रभावी सादरीकरण केले.
प्रास्ताविक डॉ .सविता गोविंदवार यांनी केले. यावेळी त्यांनी बोलींचा जागर कार्यक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाची निवड केल्याबद्दल भाषा संचालनालयाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.वैशाली लिचडे यांनी, तर आभार प्रा.निहार बोदेले यांनी मानले.
































