गडचिरोली : लंडन येथे झालेल्या जागतिक ‘मानववंशशास्त्र व शिक्षण’ या विषयावरील परिषदेत विविध विषयांवरील संशोधन सादर करण्यासाठी जगभरातील अभ्यासक उपस्थित होते. यात भारतातील आदिवासी निवासी शाळा आणि त्यात रुजत चाललेला वसाहती दृष्टीकोन, म्हणजेच आदिवासीकेंद्रीत नसलेल्या शैक्षणिक व्यवस्थेमुळे जगभरातील आदिवासी समाजाचे होणारे सामाजिक-सांस्कृतिक शोषण, हा या परिषदेतील प्रमुख चर्चेचा विषय होता. यात अॅड.बोधी रामटेके यांनी गडचिरोली जिल्ह्यातील गोंड आदिवासी समाजाने सुरु केलेल्या गोंडी माध्यमाच्या शाळेवर केलेले संशोधन मांडले.
अॅड.रामटेके हे मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील असून, सध्या युरोपियन सरकारच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून युरोप खंडातील चार देशातील नामांकित विद्यापीठात कायद्याचे उच्च शिक्षण घेत आहेत.
स्वतंत्र भारतातील शैक्षणिक धोरणे आदिवासी समाजाच्या गरजा लक्षात न घेता त्यांच्यावर सरसकट थोपवले आहेत, ज्यामुळे आदिवासी समाज त्यांच्या भाषा, संस्कृती, परंपरांपासून दूर जात आहे. भाषा, संस्कृती नष्ट होणे म्हणजे त्या समाजाचे अस्तित्व धोक्यात येणे होय. ‘मागास, असंस्कृत किंवा जंगली’ असा आदिवासी समाजाला घेऊन असलेला दृष्टीकोन अद्याप कायम आहे, असे मत त्या परिषदेत अॅड.रामटेके यांनी मांडले. पुढे आदिवासी समाजाला पूरक नसलेल्या शैक्षणिक धोरणांना आव्हान देत, आदिवासी विकासासाठी एक आदर्श शैक्षणिक प्रणाली म्हणून गडचिरोलीच्या मोहगावातील गोंडी शाळा कश्याप्रकारे उभी राहिलेली आहे, यावर भाष्य करण्यात आले.
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे 2019 साली ग्रामसभांनी एकत्रित येऊन ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध गोटून’ या शाळेची स्थापना केली. ज्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात गोंडी भाषेत प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. संविधानातील अनुच्छेद 350 (अ) अन्वये मातृभाषेत शिक्षण देण्याबाबतची जबाबदारी शासन व्यवस्थेवर सोपावली आहे. यासोबतच ग्रामसभांना पेसा किंवा वनहक्क कायद्याअंतर्गत त्यांची संस्कृती, भाषा संवर्धन करण्याचा सुद्धा अधिकार आहे, ज्याचा वापर करत ही शाळा अस्तिवात आली.
मातृभाषेतून शिक्षण देणारी शाळा अनधिकृत?
अधिकारांच्या कक्षेत राहून सुरु असलेल्या शाळेला 2022 साली शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत ‘अवैध किंवा अनधिकृत’ ठरविण्यात आले. शाळेच्या स्थापनेपासून त्यांना अवैध ठरविल्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून सुरु असलेल्या लढ्याबाबतच्या एकूणच संघर्षाबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली. कॅनडा व जगभरातील अभ्यासकांनी अनेक दाखले देत सिद्ध केले की, सांस्कृतिक वातावरणात, मातृभाषेतून शिक्षण दिल्यास त्या समाजाचा एकंदरीतच विकास होतो. परंतु तसे न करता शाळेला अनधिकृत ठराविणे असंविधानिक असल्याचे मत रामटेके यांनी मांडले.
मोहगाव ग्रामसभेचे देवसाय आतला, बावसू पावे, शिक्षक शेषराव गावडे व इतर शिक्षकांचा परिषदेत उल्लेख झाला. गोंड आदिवासी समाजाच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमाची जगभरातील अभ्यासकांनी प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.