गडचिरोली : गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि.26) ‘व्हिजन गडचिरोली 2025’ या खुल्या चर्चासत्राचे आयोजन आयोजन आ.डॅा.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील सभागृहात केले होते. यात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रोजगार, कृषी, सिंचन, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, उद्योग आणि पायाभूत सुविधा या महत्त्वपूर्ण विषयांवर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह युवा वर्गाने सविस्तर मत मांडत चर्चा केली.
यावेळी माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एस.टी.मोर्चा) डॉ.अशोक नेते, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, अनिल तिडके, महेश काबरा, प्रा.मुनघाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगत त्यावर मंथन होण्यासाठीच या चर्चासत्राचे आयोजन केल्याचे सांगितले. विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली मते, सूचना आणि अनुभव मांडले. या माध्यमातून गडचिरोलीच्या विकासाला ठोस दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या उपक्रमातून जिल्ह्याला समृद्ध व प्रगत करण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी व्यक्त केला.