गडचिरोली : गेल्या 4 दशकांपासून नक्षली दहशतीमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासाला खिळ बसली होती. पण आता ही दहशत संपुष्टात येत असताना पर्यटन विकासावर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन (जिल्हा परिवर्तन समिती) आणि सोबाय टुरिझम एलएलपी (ट्रायबी टुर्स) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचे मार्केटिंग, विविध स्थळांवर सहली आणि शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. विशेषत: नाईट कॅम्पिंग, अॅडव्हेंचर टुरिझम, ट्रायबल व इको-टुरिझम, धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन, निसर्गस्थळी आरोग्य व शैक्षणिक शिबिरे अशा उपक्रमांची अंमलबजावणी यात केली जाणार आहे.
जिल्ह्यातील मुतनुर, टिपागड, चपराळा अभयारण्य, महादेवगड यांसह विविध पर्यटनस्थळांवर कॅम्पिंग, ट्रेकिंग, निसर्गभ्रमण, आदिवासींचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि होमस्टे प्रकल्प राबवले जातील. या उपक्रमांतून स्थानिक युवकांना गाईड, प्रशिक्षक, होमस्टे व्यवस्थापन तसेच महिलांना हस्तकला व स्वयंपाक विक्रीद्वारे रोजगार मिळणार आहे.
जिल्ह्याच्या विविध भागात पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशी स्थळं आहेत. पण नक्षली दहशतीमुळे आतापर्यंत या स्थळांवर पर्यटक मुक्तपणे जाऊ शकत नव्हते. मात्र आता बहुतांश भागातून नक्षली दहशत संपुष्टात आल्याने प्रशासनाकडून या स्थळांचा विकास करून पर्यटकांना तिथे पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला जात आहे. या माध्यमातून गडचिरोलीचा सकारात्मक चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न होणार आहे.