आरमोरी : मानवी जीवन जगताना कुटुंबाला महत्त्व दिले आहे. कुटुंबाचे संस्कार हे त्या कुटुंबातील सदस्यांना घडविण्याचे काम करीत असते. कुटुंबाची गौरवशाली परंपरा त्या विचारांवर चालत राहणे ही सोपी बाब नाही. त्यामुळे मनुष्याच्या जीवनात कुटुंब, त्यातून मिळणारे संस्कार यांना सर्वात जास्त महत्व असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते तथा सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आरमोरी येथील स्वागत मंगल सभागृहात आयोजित जिल्हा गौरव पुरस्कार वितरण व आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षात वाघाच्या हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना धनादेश वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला पद्मश्री परशुराम खुणे यांच्यासह सत्कारमूर्ती किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, तर विशेष अतिथी म्हणून गडचिरोली नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, आदर्श विद्यालयाचे सचिव मोतीलाल कुकरेजा, आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार, उपसभापती व्यंकटी नागीलवार, भाग्यलक्ष्मी खोब्रागडे, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदर पंजवानी, आरोग्य सभापती भारत बावनथडे, गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, शालिक विधाते, दादाजी चौधरी, वसंतराव मेश्राम, श्रीहरी बंडावार, मानद सचिव अनंत साळवे, खेमराज पाटील डोंगरवार, डॉ.लाकडे, जागोबा खेडकर, भैय्याजी वाढई, डॉ.दुर्वेश भोयर, खिरसागर नाकाडे, मदन मेश्राम, हेमंत पाटील खुणे, प्रा.शेषराव येलेकर, तानाजी चापले, चंद्रकांत शिवरकर यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी अरविंद सावकार म्हणाले, भाग्यवानजी खोब्रागडे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व धार्मिक कार्यासह इतर क्षेत्रातील सक्रिय योगदानामुळे त्यांचा नावलौकिक आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाची निवड ‘जिल्हा गौरव पुरस्कारासाठी’ होणे ही बाब आरमोरीकरांसाठी अत्यंत आनंददायी, तर युवा वर्गांसाठी प्रेरणादायक आहे. शांत, प्रेमळ, दिलदार, उत्साही सुस्वभावामुळे त्यांनी जनतेचा विश्वास व मन जिंकले, म्हणूनच ते लोकनेते म्हणून सुपरिचित आहेत.
पद्मश्री परशुराम खुणे म्हणाले, शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणाची उंची गाठलेली आहे. त्यांनी आपले शैक्षणिक क्षेत्र आपल्या सर्वांसाठी खोलून दिलेले आहे. या कार्याची दखल घेऊन जिल्हा सहकारी बँकेने त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला. असे पुरस्कार माणसाला प्रेरणा देतात, जगण्याची जिद्द देतात, अशी माणसं मात्र आता दुर्मिळ झालेली आहे, अशी भावना व्यक्त केली.
सत्कारमूर्ती खोब्रागडे म्हणाले, हा जीवनगौरव पुरस्कार माझ्यासारख्या माणसाला देऊन मोठा सन्मान दिला आहे. परंतु माझे कार्य मोठे नाही, मला मिळालेला हा पुरस्कार माझा नसून आरमोरीकरांचे प्रेम आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी जनतेला समर्पित करीत आहे, अशी भावोद्गार व्यक्त केले.
आमदार कृष्णा गजबे म्हणाले, काही लोक स्वतःच्या गुणांनी व कर्तृत्वाने स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार करतात आणि ती प्रतिमा त्यांचा परिचय करून देते. सत्कारमूर्ती भाग्यवान खोब्रागडे हे त्यापैकीच एक असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक भाषणात बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रकाश सावकार पोरेड्डीवार म्हणाले, संस्कृती व सांस्कृतिक मूल्ये जोपासणारे भाग्यवान खोब्रागडे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून शिक्षणाची दालने उघडी केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देत असल्याचे सांगितले.
कार्यवेध पत्रिकेचे विमोचन
यावेळी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार व मान्यवरांच्या उपस्थितीत पद्मश्री परशुराम खुणे यांच्या हस्ते शिक्षण महर्षी भाग्यवान खोब्रागडे यांना सन 2023-24 चा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व रोख 51 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून खोब्रागडे यांच्या कार्यवेध पत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
व्याघ्रहल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबांना मदत
3 जानेवारी 2024 रोजी सुलोचना विठ्ठल गोडे रा.वाकडी व 14 मे 2024 ला आंबेशिवणी येथील पार्वता बालाजी पाल या महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्या. तसेच नरोटी येथील विजया विलास गेडाम यांच्यावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या सर्वांच्या वारसांना प्रत्येकी 75 हजारांचा धनादेश गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच सहकारी बँकेत मागील 40 वर्षांपासून सुरळीत खाते असलेले पत्रुजी भांडेकर, नथूजी देवीकर, अनुसया टिचकुले, तानू गोंडोळे, सिंधू भोयर, कुसुम हेडाऊ, मोतीराम मुरवतकर, बाळकृष्ण डोकरे, वेणू वडपल्लीवार, शालिनी गेडाम अशा 10 जेष्ठ खातेधारकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॅा.नरेंद्र आरेकर यांनी, तर आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी मानले.