गडचिरोली : लॅायन्स क्लब गडचिरोली आणि अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरापासून 40 कि.मी.अंतरावर असलेल्या वानरचुवा या दुर्गम आदिवासी गावात दिवाळीनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी आदिवासी बांधवांशी संवाद साधत अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अंनिस)तर्फे बुवाबाजी, चमत्कार कसे खोटे असतात हे वैज्ञानिक प्रयोगांव्दारे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच आदिवासींच्या मुलांनी शिकून मोठे व्हावे व आपल्या गरिब पालकांचे आधारस्तंभ व्हावे याकरीता त्यांना शैक्षणिक,आर्थिक अशी मदत करण्याची इच्छा सर्व सदस्यांनी आपल्या मनोगतातून बोलून दाखविली.
आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांच्यासोबत हितगुज करण्यात आले. तसेच गावातील जवळपास ६५ कुटूंबांना लाॅयन्स क्लब व अंनिसचे सर्व सदस्य तथा इतर दानदात्यांकडून जमा झालेल्या रकमेतून दिवाळीचा फराळ, टाॅवेल, ब्लाऊज पिस, साडी, ब्लँकेट व काही कपडे देण्यात आले.
यावेळी लॅायन्स क्लबच्या अध्यक्ष मंजुषा मोरे, सचिव नितीन चंबुलवार, झोन चेअरपर्सन दीपक मोरे, कॅबिनेट ऑफिसर सुरेश लडके, देवानंद कामडी, नितीन बट्टुवार, संध्या येलेकर, स्मिता लडके, सुचिता कामडी तसेच अंनिसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.