खरीपाची ई-पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण करा

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गडचिरोली : खरीप हंगाम 2025 साठी पीक पाहणी प्रक्रियेने वेग घेतला आहे. ही पाहणी शासनाने दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे. ई-पीक पाहणी ही प्रक्रिया DCS मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने राबवली जात आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

राज्यातील महसूल विभागाने 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू केला आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार रबी 2024 पासून संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) प्रणालीद्वारे अनिवार्य करण्यात आली आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

गडचिरोली जिल्ह्यातही याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या DCS मोबाईल ॲपचे व्हर्जन 4.0.0 अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ते त्वरित अपडेट करून वापरात आणण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.(अधिक बातमी खाली वाचा)

नोंदणीची वेळापत्रक आणि जबाबदारी
खरीप 2025 साठी शेतकरी स्तरावरील पीक पाहणी 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत, तर सहाय्यक स्तरावरील पाहणी 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सहाय्यक कर्मचाऱ्यांवर विसंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

सहाय्यकांची नियुक्ती व अडचणीसाठी मदत
पीक पाहणीदरम्यान कोणतीही अडचण आल्यास, गावनिहाय नेमण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्यापासूनच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज असतील. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या 7/12 उताऱ्यावर आधारित खरीप हंगामातील पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲपद्वारे वेळेत पूर्ण करावी, असे प्रशासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

डिजिटल पीक पाहणी ही शेतकऱ्यांच्या भविष्यातील पीक विमा, नुकसानभरपाई व शासकीय योजनांच्या लाभासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

त्यामुळे ही पाहणी दिलेल्या वेळेत व अचूकरीत्या पूर्ण करणे ही प्रत्येक शेतकऱ्याची प्राथमिकता ठरावी, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आपल्या आवाहनात नमूद केले आहे.