Home दैनंदिन बातम्या माओवाद्यांसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, आत्मसमर्पणाचे आवाहन

माओवाद्यांसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, आत्मसमर्पणाचे आवाहन

धर्मरावबाबा, ललितानेही घातली साद

गडचिरोली : एकेकाळी नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडून अपहरणाचा सामना केलेल्या माजी मंत्री आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी नक्षलवाद्यांनी आता हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे, असे आवाहन केले आहे. सरकारच्या आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून शांततेने जीवन जगण्याचा सल्ला त्यांनी तमाम माओवाद्यांना उद्देशून दिला आहे. तर दुसरीकडे जंगलात भटकंती आणि हिंसेच्या मार्गातून काहीही साध्य होत नाही, हे स्वतःच्या 22 वर्षातील अनुभवातून स्पष्ट झाल्याने “हिंसेचा मार्ग सोडा आणि संविधानाचा स्वीकार करून मुख्य प्रवाहात या,” असे भावनिक आवाहन आत्मसमर्पित नक्षलवादी संगीता उर्फ ललिता यांनी अजूनही चळवळीत कायम असलेल्या आपल्या माजी सहकाऱ्यांना केले आहे.

संगीता उर्फ ललिता यांनी पती गिरिधर तुमरेती व इतर साथीदारांसह दि.22 जून 2024 रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. सुमारे दोन दशकांहून अधिक काळ (2002 पासून) नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या संगीता यांनी या काळात जंगलातील कठीण जीवन अनुभवले; मात्र हा मार्ग चुकीचा असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हिंसेचा त्याग करत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सांगितले की, “नक्षल चळवळीत राहून कोणताही सकारात्मक बदल घडत नाही. उलट स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य अंधारात जाते. त्यामुळे मी संविधानिक मार्ग स्वीकारला आहे.”

आपल्या उर्वरित सहकाऱ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, “उगीच जंगलामध्ये भटकू नका. तुमचे आई-वडील, कुटुंबीय तुमची वाट पाहात आहेत. त्यांच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी आत्मसमर्पण करा व सामान्य जीवन जगा.”

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी 31 मार्च 2025 पर्यंत नक्षल चळवळ संपविण्याचे जाहीर केले होते. ती मुदत संपण्यासाठी आता जेमतेम 10 दिवस शिल्लक असल्याने चळवळीत काम करणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी असू शकते. त्यामुळे पोलीस विभागासह सर्वांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली जिल्ह्यात शिल्लक असलेले 6 माओवादी आत्मसमर्पण करतात का, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.