गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे 3 ते 9 जानेवारीदरम्यान राधाकृष्ण मंदिरात आयोजित श्रीमद् भागवत ज्ञान सप्ताहाच्या समारोपीय सोहळ्याला माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांनी विशेष उपस्थिती लावली.
या सप्ताहात कथावाचक रविशंकर मिश्रा महाराज यांच्या अमृतवाणीने उपस्थित भाविकांना अध्यात्मिक समाधान व जीवनमूल्यांची दिशा दिली. यावेळी संबोधित करताना डॅा.नेते म्हणाले, ‘आजच्या धावपळीच्या व अस्थिर काळात भागवत सप्ताहाचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांतून समाजात आचार, विचार व संस्कार घडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेले ‘माणूस द्या मज माणूस द्या’ हे तत्व केवळ शब्दांत न ठेवता आचरणात आणले पाहिजे. भागवत सप्ताहाचा आज समारोप होत असला, तरी या सात दिवसांत मिळालेले चांगले विचार आत्मसात करून ते कृतीत उतरवले, तरच भागवत सप्ताहाचे खरे फलित मिळते.’
पुढे बोलताना डॉ.नेते म्हणाले, ‘या राधाकृष्ण मंदिरात भागवत सप्ताह होणे हे माझ्यासाठी समाधानकारक आहे. सन 2022-23 या सत्रात माझ्या स्थानिक विकास निधीतून येथे सभा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था झाली. या भागवत सप्ताहाला उपस्थित राहण्याचा योग मला लाभला, हे मी माझे भाग्य समजतो.’
दरम्यान, कुरखेडा येथे दि.2 ते 11 जानेवारीदरम्यान सार्वजनिक हनुमान मंदिर, गांधी वॉर्ड येथे आयोजित शिवमहापुराण कथा कार्यक्रमालाही मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी सदिच्छा भेट दिली. या शिवमहापुराण कथेत कथाव्यास पं.अविनाश दुबे महाराज यांच्या प्रभावी वाणीतून शिवभक्तांना अध्यात्मिक अनुभूती लाभत आहे.
या दोन्ही धार्मिक कार्यक्रमांप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक सागर निरंकारी, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख, जांभुळखेडाचे सामाजिक नेते तथा सेवानिवृत्त पोलीस कान्हूजी लोहंबरे, शहर महामंत्री मंगेश मांडवे, तुषार कुथे, मंदिर सचिव श्याम लांजेवार यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
































