गडचिरोली : झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्लारपुरे लिखित “जत्रा घडली नागोबाची” या महानाट्याचा पुस्तक विमोचन सोहळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगाचे औचित्य साधून सदर नाट्यप्रयोगात ‘मारवाडी’ हे पात्र रंगविणारे जेष्ठ झाडीपट्टी नाट्यकलावंत सुनील काशिराम चडगुलवार यांचा तसेच सर्व कलावंतांचा पुस्तके, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. (सविस्तर बातमी खाली वाचा)
सदर नाट्य प्रयोगात एकुण 28 कलावंत आणि 12 तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सन 2000 साली प्रथम प्रयोग रथसप्तमीला नागोबा देव यात्रेच्या दिवशी मौजा अडपल्ली येथे सादर करण्यात आला होता. सुनील चडगुलवार यांनी झाडीपट्टी रंभुमीवर गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर व वर्धा येथे सन 1980 ते आजपर्यंत 500 च्या वर मराठी नाट्य प्रयोगात विनोदी व इतर भुमिका उत्कृष्टपणे साकारलेल्या आहेत. तसेच ‘रानगर्भ फुलत आहे’ या कविता स्पर्धा 2024 मध्ये सादर केलेल्या त्यांच्या ‘वेदना’ या कवितेला उत्कृष्ट कविता व कवी म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.