

गडचिरोली : जिल्ह्यात 9 दिवसीय दुर्गा उत्सवाला सोमवारी मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. गडचिरोलीसह आरमोरी, अहेरी, कुरखेडा, चामोर्शी आणि अनेक ठिकाणी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांकडून घटस्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे सुरजागड इस्पात कंपनीने प्रकल्पाची पायाभरणी केलेल्या वडलापेठसारख्या छोट्या गावातही जोशी परिवार आणि स्थानिक महिलांच्या पुढाकाराने दुर्गा उत्सव साजरा केला जात आहे.
आरमोरी येथील 41 वर्षांची परंपरा असलेल्या जुन्या मोटार स्टॅन्डवरील दुर्गा उत्सवासाठी उज्जैन येथील देवी हरसिद्धी माता मंदिरातून ज्योत आणण्यात आली. दुर्गामूर्ती आणि दिव्य ज्योतीच्या भव्य मिरवणुकीत मा.आ.कृष्णा गजबे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
अहेरी तालुक्यातील सुरजागड इस्पात या लोहप्रकल्पाची पायाभरणी झालेल्या वडलापेठ गावात गेल्यावर्षीपासून जोशी परिवाराच्या पुढाकाराने दुर्गोत्सव साजरा करण्यास सुरूवात झाली. यावेळी मिआम फाउंडेशनच्या संचालिका नितू जोशी आणि सुरजागड इस्पातचे संचालक वेदांश जोशी यांच्यासह गावातील महिला-पुरूषांनी उत्साहात सहभागी होऊन घटस्थापना केली. या उत्सवादरम्यान भजन, जादूचे प्रयोग, सिंदूर खेला, आॅर्केस्ट्रा, संगीत खुर्ची, मुलांसाठी नृत्य स्पर्धा, हवन, काला असे विविध धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
मा.खा.डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते प्रतिष्ठापना
गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन चौकात अनेक वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरलेल्या दुर्गामाता उत्सवात यंदाही परंपरा जपत दुर्गा उत्सवाला सुरूवात झाली. नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रेड्डी गोडाऊन चौकातील दुर्गादेवीच्या पहिल्या आरतीचा मान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांना लाभला. यावेळी डॉ.नेते यांनी मनोभावे माता दुर्गेचे पूजन करून “समाजातील प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी, आनंद व आरोग्य लाभो” अशी मंगलकामना केली.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रकाश निकुरे, चंद्रशेखर साळवे, निलेश बोम्मनवार, सोनू ब्राम्हणवाडे, भाऊराव कुनघाडकर, धनंजय हिवसे, मनिष भुस्कुडे, विष्णू कांबळे, नरेश हजारे, मनिष बानबले यांच्यासह शहरातील मान्यवर व भाविक उपस्थित होते.