नवरात्रौत्सवानिमित्त आदिशक्तीचा जागर, अनेक ठिकाणी गरबा-दांडियाची धूम

गडचिरोलीत मांसविक्रीची दुकाने बंद

गडचिरोली : दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्याचे प्रतीक म्हणून आदिशक्ती दुर्गादेवीला सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने पुजले जाते. याच दुर्गेच्या नऊ दिवसीय उत्सवाला गुरूवारपासून सुरूवात झाली. गडचिरोली शहरासह आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, चामोर्शी आणि इतरही तालुक्यांमध्ये सार्वजनिक मंडळांच्या वतीने घटस्थापना करण्यात आली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी गरबा-दांडियाचे आयोजन केले जात असल्याने उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण पहायला मिळणार आहे.

गडचिरोलीतील सुप्रसिद्ध कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रीनिमित्त यावर्षीही दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. जवळच असलेल्या मार्केट लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात मांस विक्रीची दुकाने आहेत. सदर दुकाने नवरात्रीनिमित्त बंद ठेवण्यात यावी, अशी विनंती कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी केली. त्यांच्या विनंतीनुसार सर्व दुकानदारांनी दुर्गा उत्सव होईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गडचिरोली शहरांत प्रथमच दुर्गोत्सवात मांस विक्री होणार नाही हे विशेष.

दुर्गा उत्सवानिमित्त अनेक भाविक देवीला आपल्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी आर्जव करतात. त्या ईच्छा पूर्ण झाल्या की आपापल्या परीने भेट चढवतात. यावर्षीसुद्धा देवीची मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली आहे. कारगिल चौक मंडळाने गरबा दांडियाचेही आयोजन केले आहे. नागपूर येथील वेलोकार ज्वेलर्सतर्फे उत्स्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्याला एक ग्रॅम सोन्याची चपलाकंटी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना त्यासाठी कुपनही देण्यात येणार आहे.