गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर जाणवले 5.3 तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के

तेलंगणात केंद्र, सतर्क राहा- जिल्हाधिकारी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर आज सकाळी 7.27 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागात या धक्क्यांची तीव्रता थोडी जास्त होती. मात्र कुठेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप नाही. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.3 एवढी नोंदविल्या गेली.

पुन्हा अशा प्रकारचे धक्के (कंपनं) जाणवण्याची शक्यता असून नागरिकांनी घाबरून न जाताना सतर्क राहावे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी. इमारतीबाहेर मोकळ्या जागेत सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

तेलंगणातील ज्या मुलुगू येथे या भूकंपाचे केंद्र होते ते ठिकाण सिरोंचापासून सर्वाधिक जवळ, म्हणजे जवळपास 70 ते 80 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र सिरोंचाच नाही तर कोरचीपर्यंत या भूकंपाची कंपनं जाणवली.