गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी असलेल्या मुदतीच्या 48 तास आधी मतदार संघामध्ये सायलेन्स पिरियड (शांतता काळ) राहणार आहे. त्यामुळे या काळात जाहीर प्रचार करता येत नाही. या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत. यानुसार तीनही विधानसभा मतदार संघात 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजतानंतर जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यानंतर घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांकडून मतदारांना आपल्या बाजुने वळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
आज शेवटच्या दिवशी कोणत्याही जाहीर सभा न घेता काही मोठ्या पक्षांचे उमेदवार रॅलीच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करणार आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत ही रॅली समाप्त करावी लागणार आहे.
जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईडही देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. निवडणूक ओळखपत्राशिवाय (EPIC) कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत प्रसार माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन निवडणूक यंत्रणेने केले आहे. मतदारांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.