गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा (भा.प्र.से.) यांनी 30 ऑक्टोबर रोजी धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयातल्या मतदान केंद्राला भेट दिली. केंद्र क्रमांक 92 या दिव्यांग मतदान अधिकारी संचालित मतदान केंद्रावर असलेल्या सोयीसुविधांची व स्वच्छतेची त्यांनी पाहणी केली.
पारडी नाका येथील स्थिर निगराणी पथकालाही कटारा यांनी भेट देऊन सदर नाक्यावरील वाहन तपासणीबाबत आढावा घेतला. निवडणुकीसंदर्भात नियमांचे पालन करून योग्य प्रकारे वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांनी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असलेल्या सुरक्षा कक्षाचीसुद्धा पाहणी करून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत गडचिरोली विधानसभेसाठी नियुक्त झालेले कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक हृदय कांत (भापोसे), खर्च निवडणूक निरीक्षक राजेश कल्याणम (भाप्रसे), अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश (भापोसे), गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी) अमित रंजन व अन्य अधिकारी उपस्थित होते.