अहेरी : राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमलापूर येथील हत्तींचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. त्यांना पाहण्यासाठी सहकुटुंब अनेक पर्यटक लांबून येतात. मात्र या हत्तींच्या पार्यांना भेगा पडू नये यासाठी केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचारांमुळे हे हत्ती दि.30 जानेवारीपासून 12 फेब्रुवारीपर्यंत पर्यटकांना भेटण्यासाठी उपलब्ध राहणार नाही.
कमलापूर कॅम्पमध्ये सध्या 9 हत्ती आहेत. वातावरणातील बदलामुळे हत्तींच्या पायांना भेगा पडणे, जखमा होणे आणि त्यामुळे चालण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दक्षता म्हणून पुढील 13 दिवस सर्व हत्तींच्या पायांना आयुर्वेदिक औषध लावून ‘चोपिंग’ केले जाणार आहे. त्यात आयुर्वेदिक औषधीयुक्त वनस्पती आणि तेल याचा लेप लावला जातो. 12 फेब्रुवारीपर्यंत पर्यटकांनी कॅम्पला भेट देऊ नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी जी.जी.गडमडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॅा.एन.आर.चव्हाण, क्षेत्र सहायक एस.के.पेंदोर, वनपाल आर.एस.साबळे, वनरक्षक एच.एच.शहा यांची चमू हे उपचार करणार आहे.
































