अहेरी : वारंवार सूचना करूनही कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत, कामाच्या पद्धतीत आणि कार्यालयीन शिस्तीत सुधारणा होत नसल्याने अहेरीच्या एसडीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. अहेरीचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे (आयएएस) यांनी सोमवारी एक नायब तहसीलदार आणि शिपाई वगळता सर्वांना निलंबित करत असल्याचे सांगून त्यांच्या कक्षाला सील ठोकले.
कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांची असताना कोणीच कर्मचारी वेळेवर आले नसल्याचे पाहून एसडीओ वैभव वाघमारे संतापले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या कार्यालयात बसण्यास मनाई केली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कर्मचाऱ्यांचे वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहणे, कामात दिरंगाई करणे, निष्काळजीपणे वागणे, अकार्यक्षमता, असहकार्य अशा बाबी निदर्शनास आल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वाघमारे यांनी सुधारणा करण्याची तंबी कर्मचाऱ्यांना दिली होती.परंतू त्यांच्यात कोणताही फरक जाणवत नसल्याचे निदर्शनास आल्यावर सोमवारी कारवाईचा बडगा उगारला.
माझी पुढील कारवाई होताच कार्यालयाचे सील काढण्यात येईल आणि चौकशीच्या अधीन राहून कर्मचाऱ्यांना कामे करावी लागतील, अशी माहिती एसडीओ वैभव वाघमारे यांनी दिली.