18 ऑगस्टला आलापल्लीत रोजगार मेळावा, सर्व युवक-युवतींनी उपस्थित राहावे

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन

अहेरी : जिल्ह्यात मोठमोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला आणखी जोड देत येत्या 18 ऑगस्ट रोजी आलापल्ली येथील क्रीडा संकुलाच्या आवारात भव्य रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. त्या मेळाव्याला जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात कोनसरी येथील लोह प्रकल्पासोबतच अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात कंपनीचा स्टील प्रकल्प होऊ घातला आहे. यासह आणखी काही प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यासाठी विविध कंपन्या कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात येणार आहे.

लोकांनी मोठ्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिले असून सिंचन, शिक्षण आणि रोजगार यावर आपला भर आहे. येथील शेती सुजलाम सुफलाम व्हावी म्हणून विविध ठिकाणी उपसा सिंचन करून पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शिक्षणासाठी तर काम सुरूच आहे, सोबत बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या हेतूने मोठमोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. सुरजागड इस्पात कंपनीच्या स्टील प्रकल्पानंतर अडीच हजार कोटींचा आणखी एक प्रकल्प होणार आहे. त्यामुळे सुशिक्षित युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.