एकलव्य निवासी शाळेत प्रवेश हवा? मग करा स्पर्धात्मक परिक्षेची तयारी

25 जानेवारीपर्यंत स्वीकारणार अर्ज

गडचिरोली : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधील इयत्ता सहावीत आणि इयत्ता 7 ते 9 वी मधील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या 23 फेब्रुवारीला ही परीक्षा होणार आहे.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगर परिषद, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांत इयत्ता 5 वी, तसेच इयत्ता 6 ते 8 व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती/ आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 23 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता 6 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत, तर इयत्ता 7 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ही परीक्षा होणार आहे.

या प्रवेश परीक्षेसाठी एकलव्य निवासी शाळा चामोर्शी (स्थित शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली) आणि एकलव्य निवासी शाळा कोरची या केंद्रांवर स्पर्धा परिक्षा घेण्यात येणार आहे.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी ते 8 व्या वर्गात शिकत असलेले, परंतू ज्या पालकांचे वार्षीक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी आहे अशाच पालकांचे अनुसूचित /आदिम जमातीचे पाल्य (विद्यार्थी) हे सदर स्पर्धा परिक्षेस बसण्यास पात्र राहतील. परीक्षेबाबतचे प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तसेच नजिकच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध होतील. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2025 आहे.

एकलव्य निवासी शाळेत प्रवेशासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे अर्ज सादर
करावे, असे आवाहन गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले आहे.