गडचिरोली : अपस्मार, फिट, मिरगी यासाख्या मेंदूविकारांनी (इपिलेप्सी आजाराचे रूग्ण) ग्रस्त असलेल्या रुग्णांना वेळीच उपचार मिळावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने रविवारी गडचिरोलीत मेंदूविकारांनी ग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. मुंबईच्या तज्ज्ञ डॅाक्टरांकडून झालेल्या या तपासणी शिबिरात 0 ते 18 वर्ष या वयोगटातील 124 तर 18 वर्षावरील 87 अशा एकूण 211 रुग्णांची नोंदणी करण्यात आली. 18 वर्षाखालील रुग्णांची लक्षणीय संख्या समस्त पालकवर्गाची चिंता वाढविणारी बाब ठरली आहे. यामागील कारणांचा वेळीच शोध घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
या शिबिराचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.निर्मल सूर्या, आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.प्रमोद गवई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके, तसेच माजी पं.स.सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्याचे आवाहन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. या आजाराचे वेळीच निदान व औषधोपचार व्हावा यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. या कार्यात इपिलेप्सी संस्थेने मुंबई-चेन्नई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानून रूग्णसेवेच्या या कार्यात शासनामार्फत आवश्यक सर्व मदत दिल्या जाईल याबाबत आश्वस्त केले.
रुग्णांवर डॉ.निर्मल सूर्या यांच्यासह डॉ.दीपक पलांडे, डॉ.व्हि.एस.मानेक, डॉ.गुहान राममुर्ती, डॉ.वसंत डांगरा, डॉ.निरज बाहेती, डॉ.ध्रुव बत्रा, डॉ.अमित भट्टी, डॉ.मंगल कार्डीले आदी मुंबई, नागपूर व चेन्नई येथील प्रख्यात न्युरोसर्जन, न्युरोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, सॉयकालॉजिस्ट तज्ज्ञ व त्यांच्या चमूकडून उपचार करण्यात आले. रुग्णांना ई.ई.जी, रक्त तपासणी, समुदेशन, भौतिकोपचार, वाचा व भाषा विकार उपचार, ३ महिन्यांची औषधे इत्यादी सुविधा देण्यात आली.
याप्रसंगी शासकिय वैद्यकिय अधिकारी व खासगी वैद्यकिय अधिकारी यांच्याकरिता आयोजित ईपिलेप्सी विषयावरील कार्यशाळेत ७४ वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. वैद्यकीय अधिक्षक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल हुलके, डॉ.इंद्रजित नागदेवते, डॉ.मनिष मेश्राम, डॉ.मनिष नंदनवार, डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ.राहुल थिगळे, हेमलता सांगाळे, प्रशांत खोब्रागडे, रवी भडंगे, जयेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.