‘संत तुकारामांच्या अभंगगाथेतील सामाजिकता’ विषयावर व्याख्यानासह निबंध स्पर्धा

तुकोबांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी- डॉ.आरेकर

गडचिरोली : संतांचे जन्म आणि कर्मस्थळ असणारा महाराष्ट्र, संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. तुकारामांनी भक्ती, साहित्य व अभंगाद्वारे समाजात जनजागृती निर्माण करण्याचे कार्य केले. अंधश्रद्धा, नितीमुल्ये, वैज्ञानिक दृष्टीकोन आदी विषयांचा उहापोह तुकारामांनी अभंगगाथेतून केला. अनेक अभंगांतून प्रयत्नवाद व आशावादाचा पुरस्कार केला आहे. त्यांचे विचार परखड स्वरुपाचे असून समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी केले.

“संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता” या विषयावर गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरणही करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून कुरखेडा येथील गो.ना. मुनघाटे कला, विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ.हेमराज निखाडे, प्रा.डॉ.धनराज पाटील, डॉ.प्रीती पाटील, मराठी विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ.सविता गोविंदवार तसेच विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मागदर्शन करताना प्रा.डॉ.आरेकर म्हणाले, धार्मिक संप्रदाय, पंथ आणि संत यांच्या विचारांचा प्रभाव कमी झालेला नाही. संतांचे विचार आजही आहे. संतांचे विचार मागे पडले नसून त्यांच्या विचारांचे सामर्थ्य लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच धर्म आणि श्रद्धा यांचा अनन्यसंबंध आहे, तो भक्तीच्या मार्गाने ‍सिद्ध होतो. जनता अंधश्रद्धेच्या मार्गाने जाणार नाही याची खबरदारी तुकारामांसह सर्व संतांनी घेतली. तुकारामांचा जनकल्याणाचा कळवळा कोरडा नव्हता तर त्याला कृतीचा सुगंध होता. तुकारामांचे विचार हे समाजातील अनेक वर्गांसाठी प्रेरणादायी असल्याचे डॉ.आरेकर म्हणाले.

आपण जन्माला आलो, तर व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपल्या कार्याचा उपयोग समाजासाठी व्हायला पाहीजे, हे एकदंरीत सतांच्या जीवनकार्यातून शिकायला मिळते, असे सहायक प्रा.डॉ.सविता गोविंदवार म्हणाल्या.

तुकारामांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी निबंध स्पर्धा

प्रास्ताविकात, संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.हेमराज निखाडे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ परीक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध मागविण्यात आले होते. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकता यावा, त्यांचे विचार तळागळातील नागरीकांसह, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत हा दृष्टीकोन ठेवून सदर स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये 18 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

मान्यवरांच्या हस्ते निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यावर आधारित विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाची विद्यार्थीनी स्नेहा विलास बनपुरकर हिला रोख 4 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक प्राप्त गोंडवाना विद्यापीठाच्या पीजीटीडी कॉमर्स विभागाची विद्यार्थीनी हिमाद्री भूपती गाईन हिला रोख 3 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांकप्राप्त चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल हस्तक झाडे याला रोख 2 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रोत्साहनपर बक्षिसांमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या पीजीटीडी इतिहास विभागाची विद्यार्थिनी सायली मधुकर पालथिया, नवरगाव येथील ज्ञानेश महाविद्यालयाची डेझी निखारे तसेच चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचा विशाल आनंदराव निकोडे यांना संत तुकारामांची चरित्रगंगा व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.