कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा सन्मान

हा दिवस शौर्याचे प्रतिक- नेते

गडचिरोली : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून स्पंदन फाउंडेशनच्या वतीने गडचिरोली येथे एक भावनिक आणि देशभक्तिपर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात वीर शहीदांना आदरांजली अर्पण करत जिल्ह्यातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या गौरवशाली प्रसंगी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मा.खा.डॉ.नेते म्हणाले, “देशाच्या सीमांवर आमचे वीर जवान अथकपणे आणि जागरूक राहून देशाचे रक्षण करत आहेत, म्हणूनच आपण निर्धास्तपणे जीवन जगत आहोत. 26 जुलै केवळ एक लष्करी विजय नाही, तर तो भारतीय राष्ट्राभिमान आणि शौर्याचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.

याप्रसंगी डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.डॉ. मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, डॉ.प्रशांत चलाख, डॉ.सौरभ नागुलवार, डॉ.पंकज सकिनालवार यांच्यासह अनेक नागरिक, समाजसेवक व माजी सैनिक उपस्थित होते.