गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास मंगळवारपासून सुरूवात झाली. यात पहिल्या दिवशी एकच नामांकन दाखल झाले. माजी आमदार दीपक आत्राम यांनी अपक्ष म्हणून हे नामांकन दाखल केले आहे. गडचिरोली, आरमोरीत पहिल्या दिवशी एकही नामांकन आले नाही. दरम्यान जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे मुख्यालय असलेल्या देसाईगंज (वडसा) येथे भेट देऊन तेथील तयारीची पाहणी केली.
आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 5 व्यक्तींनी 20 नामनिर्देशन अर्जांची, तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 9 व्यक्तींनी 25 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 11 व्यक्तींकडून 12 अर्जाची उचल केली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबरपर्यंत आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट दिली. तसेच देसाईगंज येथील स्ट्राँग रूमची तपासणी करून आवश्यक सूचना दिल्या. देसाईगंज तहसील कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे निवडणूक कामाकरीता नियुक्त केलेल्या विविध विभागांना भेट दिली आणि निवडणूक कर्तव्य व जबाबदारी चोखपणे पार पाडण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी, तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार व इतर अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.